शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

दुर्मिळ औषधींचे आगार

दुर्मिळ औषधींचे आगार

गर्भगिरी पर्वतरांग हे औषधी वनस्पतींचे माहेरघरच आहे. दुर्मिळ वनौषधींचे ते मोठे आगार आहे. वेगवेगळ्या वनस्पतींनी नटलेले हे डोंगर नगर व बीड जिल्ह्यांचे भूषण आहेत.
सर्व वनस्पतींचे ज्ञान नवनाथांना होते. त्याचा उपयोगही त्यांना माहिती होता. या डोंगररांगेत अशा बहुगुणी वनस्पती सापडल्यामुळे नवनाथांचे वास्तव्य या भागात दीर्घकाळ होते. विविध वन्य पशू-पक्ष्यांचाही यामुळेच या डोंगरात वावर असतो.
गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते येवलवाडी (ता. पाटोदा) दरम्यान या डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. अर्थात या खजिन्याची चावी जुन्या जाणकार व ठराविक व्यक्तींनाच सापडलेली असल्याने, विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधे देणारी अनेक मंडळी सापडतात. त्यांच्या औषधांनी आजारांवर गुणही येतो. साधी ठेच लागून जखम झाली, तर कोठेही सहज उपलब्ध होणारी "टनटनी' ही वनस्पती चोळून जखमेला "राम राम'ने ठोकणारी मंडळी कमी नाहीत, तर गजकर्ण किंवा इसबगोल यासारख्या जखमा हमखास बरे करणारी औषधी देणारी मंडळीही आहेत. बहुतेक ग्रामस्थ अनेक आजारांवर गावरान उपाय करून वेळ व पैसा वाचवितात. या डोंगरपट्ट्यातील शहा डोंगर, मांजरसुंभे, बिन्नी डोंगर, धुमाळ्या डोंगर, वाळूक टेंभा, खांडी, वाघजाई, देवदरा, पाची पोरांचे डोंगर, वृद्धेश्‍वर, बोकडदरा, सावरगाव डोंगर परिसर, पत्र्याचा तांडा (सावरगाव), आंबेवाडीचा डोंगर, येवलवाडी आदी डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. शिरुर कासार (जि. बीड) तालुक्‍यातील मानूरच्या नागनाथ देवस्थानजवळ, तर गोरख चिंचेचा विशाल वृक्ष आहे. ही चिंच अत्यंत दुर्मिळ व अनेक आजारांवर उपाय करणारी आहे. मुसळी, शतावरी, अश्‍वगंधा, सर्पगंधा, सोनतरवड, अर्जुनवेल, गुळवेल, अमृतवेल, बेल, भुईसल, चंदन, खैर, बाभूळ, अमोनी, निरधामना, हेकुळी, धावडा, वड, लिंब, घेटुळी, चिंच, सापकांदा, रानकांदा, चिबूकाटा, सराटा, रिंगणी, काटेरी रिंगणी, साबर, तरवड, रुई, तांदुळचा, धोत्रा, निंब, तुळस, रानतुळस, पानकनीस, आपाटा, एरंडी, तेलतुकडी, महादूत, निवडुंग, मेडसिंग, पाचुंदा, केकताड, दुधी, गुग्गुळ, निलगिरी, गुलमोहोर, घाणेरी, बांबू, रानमटकी, उंबर, बिबवा, महाडूक, सौंदड, अर्जुनसाल, उंबर, पिंपळ, सागर, पाथरी, पांगारा, सिंद, चिल्हर, सिसम, लोखंडी, पांढरी, रिठा, रामफळ, पळस, बहावा, निमोणी, हिवर, खिरणी, कोरफड, चिकणी, घायपती, साजरगोंडा, दवणा आदी औषधी वनस्पत
ी सर्रास आढळतात. डोंगरात चंदनाची झाडे सापडत असल्याने अनेक चंदनतस्करांची उपजीविका गर्भगिरीवर चालते. जांभूळ, आंबा, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पोपई, सीताफळ आदी फळांनी बागा बहरतात.
टेंभुर्णी, बोरे, खरमटे, कांगोण्या, जांभूळ, करवंद, निवडुंग, पिठावण्या, हामनं, खिरण्या, शेवंत्या, रानमटकी, धामण्या, तांबोरी आदी रानमेवा, तर येथील ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारा असतो. जाई-जुई, झेंडू, मोगरा जास्वंदी, शेवंती आदी सुगंधी फुलांनी डोंगर बहरतात. आनंददरी (बाळनाथ गड), वाघजाई हे डोंगर म्हणजे करवंदांची खाणच म्हणावी लागेल. शहा डोंगरावर खिरण्यांची अनेक झाडे आहेत.
गवताच्या विविधजाती येथे आहेत. त्यात कन्हेर, पवना, कुंदा, कुसळी, हरळ, शिपरुट, पाथरी, दुधावणी, कोंबडा, कुसमुड, तांदुळचा, कुंजीरचा, दिवाळी, लालडोंगा, मोळ, पानकनीस, राजहंस आदींचा समावेश आहे. प्रत्येक मोसमात या गर्भगिरीच्या झोळीत निसर्ग ही फळे - फुले भरभरून दान करतो. त्यामुळेच मधमाश्‍या, कीटक येथे मकरंद गोळा करण्यासाठी कायम घोंगावताना दिसतात. वांबोरी घाट, उदरमल घाट, पाची पोरांचे डोंगर, आनंद दरी, वाघदरी, आष्टी तालुक्‍यातील घाट, देऊळगावजवळील डोंगर, पाटोदा तालुक्‍यातील डोंगराचा भाग या भागात आगे, ब्राह्मणी, साधे मोहोळ मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळेच गोड मधाचे आगार म्हणून या गर्भगिरीकडे पाहिले जाते.
या भागात खरिपात बाजरी, वाटाणा, मूग, सूर्यफूल, तर रब्बीत ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. करडई, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणे आदींचे तेल पाडून शेतकरी घरगुती वापर करतात. पुणे येथील रसशाळेचे अभ्यासक या डोंगररांगेत विविध वनस्पतींचा अभ्यास करीत असतात.
उन्हाळी (विंचू उतरतो), पांढरी गुंज (अर्धशिशीला गुणकारी), काळे तीळ (मूळव्याधीसाठी उपयुक्त), कळलावी, धामसी, कडू दोडका, पडवळ, पादरवासी, निरगुडी, बहावा, मेडसिंग, सौंदड, वांज, करटुली, गुंज या वनस्पतींबरोबर बकान, पांढरी घोसळी, जायफळ, तांबडी जाई, टाखळ, पळस, हिरडा, मुळा, मूग मोरचूद, तोंडली, ब्रह्मदंडी, उटकटार, केवडा आदी वनस्पती त्या-त्या हंगामांमध्ये आढळतात.
उपयुक्त ठरणारी नाई ही दुर्मिळ वनस्पती या डोंगरात मोठ्या प्रमाणात सापडते. पांढरी अपमारी व नाई या दोन वनस्पतींपासून मधुमेहावर उपचार केले जातात, तसेच मधुनाशिनी ही वनस्पतीही मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरतात. नारळाची कवटी व टनटनी, तसेच इतर वनस्पतींपासून इसब या आजारावर औषध तयार होते.
चित्रक (मूळव्याध व इतर आजारांवर), धायटी, अडुळसा (कफ पातळ करण्यासाठी), बावच्याचे पीट (कोडासाठी उपयुक्त), रान भुईतरवड (पोटाच्या विकारांसाठी), सोनामुखी, हरणखुरी (उष्णतारोधक असते. हरणांच्या आवडीची वनस्पती), करटुली (फिट्‌ससाठी), पांढरी जादी (स्त्रीरोग), ज्येष्ठमध (मूळव्याधीसाठी), देवडांगरी (मोड मूळव्याधीसाठी), तालीम खाना (धातुपौष्टिक) आदी विविध आजारांवर उपचारांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वनस्पती या डोंगरात आहेत. तोंड आल्यास जाईचा पाला चावला, तर ते गुणकारी ठरते. जाई ही वनस्पती जाईच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात आहे. अर्जुन सादाड या वनस्पतीची साल हाडाला लागलेल्या मार व शरिरावरील जखमांवर गुणकारी असते.
डोंगरातील या वनस्पतींचा उपयोग करून काही ठिकाणी उद्यान सुरू केले आहेत. प्रत्येक घराच्या आवारात किमान महत्त्वाच्या दहा वनस्पती असाव्यात, यामुळे किरकोळ आजारासाठी डॉक्‍टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
"बाई मी लाजाळू गं लाजाळू' या गाण्याच्या ओळी फक्त व्यक्तीपुरत्याच मर्यादित नाही, तर त्याला अपवाद आहे "वाघजाईचा डोंगर' नगर तालुक्‍यात असलेल्या या डोंगरात लाजाळूची असंख्य झाडे आहेत. त्याला हात लावला, की ही वनस्पती आपली पाने मिटवून घेते व लाजते.
आपण डोंगरातून फिरताना अनेक मौल्यवान वनस्पती पायाखाली तुडवून जातो, पण त्यांची ओळख झाल्यास त्याचे महत्त्व अधिक कळते. या गर्भगिरीत अशाच असंख्य वनस्पती जाणकारांना खुणावतात.
गोरक्षनाथांनी पूर्ण गर्भगिरी सोन्याचा केला, असा उल्लेख पोथी-पुराणांत आहे. सध्याही या औषधी वनस्पतींचा विचार केला, तर या डोंगराचे मोल सोन्यापेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल.

१० टिप्पण्या:

Meera म्हणाले...

Khup mhatvachi information dili aahe...
& yavar sakhol abhyaas karan khup garjech aahe

Unknown म्हणाले...

गोरक्षनाथांनी आपल्या लघु शंकेने गर्भगिरी सोन्याची झाली हे बघून त्यांचे गुरू बडे बाबा मच्छिन्द्रनाथ यांनी त्या ठिकाणी संजीवनी समाधी घेतली...

Unknown म्हणाले...

निसर्गाचे संवर्धन करण्याची खूप गरज आहे

Unknown म्हणाले...

Nice Information.

Unknown म्हणाले...

अमृत वेल कुठे मिळेल

Unknown म्हणाले...

नाई,कडुनाई ही वनस्पती असेल तर फोन करा.-9623907295,विनंती.

Mhl म्हणाले...

किती पाहिजे कशासाठी 8975758411 कॉल करा

Unknown म्हणाले...

ही वनस्पती ची औषधे मिळन्याचे ठीकाण कौठे आहे कॉल करा 8411955864

Unknown म्हणाले...

माहिती छान आहे औषध मिळन्याचे कोठे मिळेल कॉल करा 8411955864

अनामित म्हणाले...

काहीही ठोकू नये