गर्भगिरी ही डोंगररांग सह्याद्रीची उपशाखा आहे. अत्यंत रम्य असलेले हे डोंगर पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहेत. या ब्लॉगमध्ये डोंगररांगेतील नाथपंथाचे महत्त्व, देवस्थाने, औषधी वनस्पती, ऐतिहासिक महत्त्व, विविध फोटो असे विविध विषयांचा समावेश आहे.
शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९
सोन्याचा गर्भगिरी
सोन्याचा गर्भगिरी
गर्भगिरी ही सह्याद्री डोंगररांगेची उपशाखा. नगर व बिड जिल्ह्याच्या दरम्यान विस्तारलेली ही डोंगररांग अत्यंत सुंदर आहे. मागील सात वर्षांपासून मी परिसराचा अभ्यास करीत आहे. गोरक्षनाथ गडापासून ते बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्हीपर्यंत कधी एकटा, तर कधी स्थानिक लोकांना घेऊन माहिती जमा करू लागलो. जस-जशी माहिती मिळू लागली, तस-तशी अधिक खोलवर माहितीसाठी मी प्रयत्न करू लागलो. पुढे तर माहितीचा खजिनाच मिळू लागला.
नवीन माहिती मिळविण्यासाठी अनेक डोंगरांवर जावे लागले. एसटी बसने संबंधित गावात जायचे, अन् डोंगर चढायला सुरूवात करायची. माझ्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी हा कार्यक्रम असायचा. सकाळी सात-आठ वाजता बाहेर पडलो, की संध्याकाळी परतायचे, असा माझा सुटीचा दिनक्रम असायचा. विविध माहिती मिळविण्यासाठी मी पूर्ण भारावून गेलो होतो. हे करीत असताना अनेक वेळा उंच डोंगरकड्यावरून घसरलो. हातापायांना जखमा झाल्या. दरोडेखोरांच्या गुहा शोध असताना, तर जीवानीशीच खेळ खेळावा लागला. भीती वाटायची, अन् ते ठिकाण सापडल्याचा आनंदही व्हायचा.
या निमित्ताने अनेक देवस्थाने लोकांसमोर आली. ही सर्व माहिती संकलित झाल्यानंतर नोव्हेंबर 2004 मध्ये "गर्भगिरीच्या कुशीत'या नावाने दै. सकाळमध्ये मालिका प्रसिद्ध झाली. त्यासाठी प्रत्येक भागाचे मी छायाचित्रे घेतलेली होती. नगर आणि औरंगाबाद- बीड आवृत्तीला ती प्रसिद्ध झाल्याने या डोंगराचे महत्त्व लोकांसमोर आले. तेथील स्थान, पर्यटन स्थळे, औषधी वनस्पतींचा सखोल अभ्यास झाल्यामुळे मालिका अधिक सुंदर व वाचणीय झाली. डोंगरांचा अभ्यास करीत असताना एखाद्या अवघड डोंगरात मी जेव्हा जाईल, तेव्हा गावातील अनेक लोकांना ते ठिकाणच माहिती नसल्याचे कळे. अर्थात त्या भागाकडे ज्यांचे शेत आहे, तीच मंडळी तिकडे जात होती. त्यामुळे संबंधित गावातील लोकही न गेलेल्या ठिकाणी मी जाऊन तेथील माहिती थेट लोकांपर्यंत आणल्याने "तूज आहे तूज पाशी, परी जागा विसरलाशी' अशी गत ग्रामस्थांची होऊ लागली.
ही माहिती घेत असताना काळू आणि कान्हू भिल्ल यांच्या कथा ऐकिवात येऊ लागल्या. ते नेमका कोण होते? कुठले होते? याची काहीच माहिती कुणी सांगू शकत नव्हते; परंतु त्यांच्या कथा मात्र अत्यंत रोचक होत्या. मी लहान असताना माझी आजी (कै.) यमुनाबाई या कायम दरोडेखोरांच्या कथा सांगत. त्यात काळू-कान्हूची कथा अधिक रोचक असे. पण ही फक्त कथा नसून सत्य घटना आहेत, हे मला नंतर कळले. त्यामुळे काळू-कान्हूचा शोध घेऊन दोघांचेही वंशज मी शोधू शकलो. हे दोघेही गरिबांचे दाता होते. त्यांची सखोल माहिती मी जमा केली आणि ती दै. सकाळमध्ये ऑगस्ट 2005 मध्ये प्रकाशित केली. माहिती खूप होती; परंतु मालिकेला मर्यादा असल्याने सर्व माहिती त्यावेळ प्रसिद्ध करू शकलो नाही. दरोडेखोरांची अत्यंत रोचक, थरारक अशी सखोल माहिती असलेल कादंबरी मी लिहिली आहे. ती लवकरच प्रकाशित होणार आहे.
डोंगरातील व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या महत्त्वाच्या देवस्थानांची, की ज्याचा या गर्भगिरीडोंगरांशी संबंध येतो, त्यांची माहिती कमीत कमी शब्दांत; परंतु पूर्णपणे येईल, अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक देवस्थानांच्या वेगवेगळ्या दंत कथा असतात. त्याचीही सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. काहींचे संदर्भ ग्रंथामध्ये सापडले, तर काही कथा फक्त लोकांच्या तोंडीच दिसतात. त्यामुळे त्यांचीही माहिती जास्त लोकांना भेटून एकवाक्यता घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार एखादी कथा थोडी वेगळीही असू शकते; परंतु मी जी जास्त लोकांच्या तोंडी होती, तीच घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी काळ-वेळ याचाही अभ्यास करावा लागला. "सकाळ'मध्ये मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मित्रांनी, ग्रामस्थांनी याचे पुस्तक लिहिण्याचा आग्रह धरला. त्याचाच परिणाम म्हणून ही साहित्यकृती नाथांच्या चरणी अर्पण करून आपणांसमोर ठेवत आहे. आपणास हे पुस्तक भावेल, अशी खात्री वाटते. त्यात काही त्रुटी असतील, त्या आवर्जून कळवाव्यात. पुढील आवृत्तीत तशी सुधारणा करता येईल.
डोंगराच्या कुशीतील ग्रामस्थ अत्यंत चांगले आहेत. गरीब आहेत. कष्टाळू आहेत; परंतु त्यांना खरी गरज आहे, ती कामांची, उद्योगांची, हा डोंगर भाग म्हणजे निसर्गाचे सुंदर रुप आहे. तेथे वनश्री नटलेली असते. नाथ संप्रदाय वाढलेल्या या भूमीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला, तर राज्यात नव्हे, देशात हा भाग प्रसिद्ध होईल. स्थानिक बांधवांना रोजगारही मिळू शकेल. खरे, तर यासाठीच हा भाग अधिक लोकांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रत्येकाने एकदा तरी या भागाला आवश्य भेट द्यावी. पावसाळ्यात फुललेला निसर्ग म्हणजे मिनी महाबळेश्वरच आहे. डोळे भरून हा निसर्ग पहावा.
धन्यवाद.
- मुरलीधर कराळे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
५ टिप्पण्या:
very nice
आपन खरोखर खुप मोलचे ्काम केले आहे। अभिनन्दन व धन्यवाद। नाथ स्थानान्चे फोटो हि प्रकशीत केले असते तर खुप छन ्झाले असते।
मी व आमचे गुरुबन्धु मिळुन व्रुद्धेस्श्वरची, मढीचि व मयाम्बचि यात्रा करून आलो।खुपच छ्ान ्परीसर आहे.
धन्यवाद अनामिक !
आपल्या सूचनेनुसार लवकरच फोटो गॅलरीत नाथांचे, स्थळांचे फोटो ब्लॉगला जोडत आहे.
thanks alot for giving photographs in the photogallery
Invaluable information u have posted I was searching for Navnath Samadhi sthaan since last 3 years
thanks u very much
God Bless u
टिप्पणी पोस्ट करा