गर्भगिरीतील गाणी
ड मोरी गाय ड येल रं ड येली
ड मोरी गायीचा ड गोऱ्हा रं ड गोऱ्हा
ड गोऱ्याला मोडलाय ड काटा रं ड काटा
ड काट्या कुट्याचा ड येळू रं ड येळू
ही काव्य रचना अर्थात कुणा मोठ्या नावाजलेल्या, पारितोषिके मिळविलेल्या कविने केली नाही, तर रोज गुरे सांभाळणाऱ्या गुराख्याची आहे. आपल्या लाडक्या गायीसमोर दीपावलीच्या आगोदर गो-बारशीला हे काव्य गायीले जाते. गो-बारशीला गुराख्यातील कवी, गायक जागा होतो. आपल्या जशा असेल, तशा स्वरात हे कवन तो करतो. वरील गाण्यात मोरी नावाची गाय व्याली आहे. तिला गोऱ्हा झालाय. हा गोऱ्हा खेळत असताना त्याला काटा मोडलाय. अशा या काट्याकुट्याच्या वेळूजवळच गाया खेळू लागल्या आहेत. पण या खेळात फांद्या फोडणारा नांद्या बैल डरतो आहे. अशा अर्थाने तो आपल्या लाडक्या गायीचं, गायांच्या खेळाचं वर्ण करतो. पुढे निळ्या गोडीवर बसन, निळ्या घोडीचा खरा, राघू मारतो भरारी आणि त्याची किंकाळी ही वरील खेळापासून अलिप्त वाटत असले, तरी गाण्याची लकब त्यामुळे अधिक स्पष्ट होते. त्यात "ड' हे अक्षर फक्त यमक जुळवून तालासाठी वापरले आहे, असे दिसते.
याच गाण्याला "ड' च्या ऐवजी "कान्हूबा' हा शब्द वापरण्याची पद्धत आहे. पण त्याची चाल थोडी वेगळी आहे. "कान्हूबा' म्हणजे कानिफनाथ. कानिफनाथ हे गर्भगिरीतील महत्त्वाचे देवस्थान. कदाचित कानिफनाथांना आपल्या गायीचं वर्णन हे गुराखी सांगत असतील. म्हणजेच ही गाणी याच परिसरातली लोकांनी रचली, असे वाटते. त्या गाण्याचे बोल असे आहेत ः
गाय येली (व्याली) कान्हुबा रं मोरी गाय येली..
झालाय गोऱ्हा कान्हूबा रं मोरीला झालाय गोऱ्हा
गोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा कान्हूबा रं गोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा
गेठ्याला मोडलाय काटा कान्हूबा रं गेठ्याला मोडलाय काटा
अशा प्रकारे हे गाणं वेगळ्या चालीने, पद्धतीने गायलं जातं. गुराख्याची दीपावलीच्या वेळी गायांसमोर म्हणण्याची ही गाणी गर्भगिरीच्या कुशीत कायम म्हटले जातात. सध्या त्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी जुन्या पद्धती सांभाळणारी मंडळी आहेत. त्या त्या गोठ्यात अजूही हे स्वर गुंजतात.
गुराख्यासाठी गाय ही खऱ्या अर्थाने माय असते. दिवसभर तो या गाया सांभाळण्याच्या निमित्ताने गायांसोबतच असतो. आणि रात्रीही गोठा सांभाळण्याची, धारा काढण्यासाठी त्याची ड्यूटी गोठ्यातच असते. कारण गायांच्या गोठ्यात रात्री एखादा तरी व्यक्ती असावाच लागतो. रात्री गाय, बैल सुटला, तर इतर जणावरांना मारतो किंवा वैरणीची नासाडी करतो, म्हणून रात्रीही तेथे माणसांची गरज असते. अर्थात हे काम या गुराख्यावरच येते. म्हणूनच गुराखी आपल्या जनावरांसी एकरूप झालेला असतो. जनावरेही त्याचा आवाज ऐकल्याबरोबर हंबरतात. वासरे गायांना पाजण्यासाठी हा गुराखीच सोडतो. त्यामुळे तो गोठ्यात आला, की वासरे हंबरतात. गायाही एकप्रकारे त्याला हाकाच मारतात. त्यामुळेच गुराख्याचं गायीविषयी अधिक प्रेम असते. हे प्रेम तो आपल्या शब्दात व्यक्त करतो. गायीचं सुरेख वर्णण तो गाण्यातून करतो.
झ्या बहुळन गायीचे पोट न
झ्या बहुळन गायीचे पोट
त्यात बसलेत देव 33 कोट रं गाय
पंढरी का बहुळन बरी
बरी गाय बरी देव मन भरी
दुध भरून देती चरी रे गाय बहुळी
या गाण्यातून तो आपल्या गायीचं वर्णन करतो. त्या गायीचं नाव बहुळन. तिच्या पोटात 33 कोटी देव बसलेत. अशाच प्रकारे गायींच्या प्रतेयक अवयवांना तो उपमा देतो. बहुळन गायीची पाठ म्हणजे सोलापूराची (सरळ आणि सपाट) वाट आहे. गायीचे शिंगे म्हणजे महादेवाची लिंगे आहेत. गायीचे कान म्हणजेच नागिणीचे तजेलदार पाणं आहेत. गायीचे डोळे म्हणजे लोण्याचे गोळे आहेत. गायीची कास म्हणजे तांदळाची रास, अशा प्रकारे तो वर्णन करतो आणि हे गाणं असंच लांबत जातं. दुसरं एक गमतीशीर गाणं या वेळी गायलं जातं.
झ्या मळ्यातून जाय रे गोपाळा तुझ्या मळ्यातून जाय रे
जाऊन जाय तिरगून जाय आकाशी पिरतंय काय रे गोपाळा
सांगून दी तव्हा जाय रे ...
एक गोपाळ (गुराखी) दुसऱ्या गोपाळाला म्हणतो. तुझ्या मळ्यातून जात असताना माझ्याही मळ्यातून जाय. आणि तेथे काय चाललंय ते बघ. सर्व काही ठिकठाक आहे ना हे बघ. तुझ्या मळ्यातून चाललाच आहेत, तर थोडा तिरगून (तसंच पुढं) माझ्याही मळ्याकडं जाय आणि या मळ्याच्या आकाशी काय फिरतंय, म्हणजेच त्या परिसरात काय काय फिरतंय ते पहा.
वरील एक कडवं गुराखी म्हणतो. दुसरा लगेच त्याला उत्तर देतो. अर्थात तेही काव्यात्मकच. दुसरा गुराखी म्हणतो...
झ्या गड्याचा हार गोपाळा रे तुझ्या गड्याचा हार
हारावर हार तिरगुण हार आकाशी फिरतीय घार गोपाळा रे
सांगन दिलं मी जातो...
अशी सुंदर उपमा देऊन तो आकाशी घार फिरत असल्याचं सांगतो. हे गाणं असंच पुढं कितीही वाढत जातं. आकाशी टिटवी फिरत आहे. हे सांगताना त्याला यमक जुळविण्यासाठी ईटीचा (विटू दांडूतील विटी)वापर होतो.
जात्यावरील ओव्या ः
पिठाच्या गिरण्या आल्यापासून जाते हे आता फक्त नावापुरतेच उरू पाहत आहे. असे असले, तरी गर्भगिरीच्या कुशीतील अनेक गावांत वीज गेल्यानंतर घराघरातून जात्यावरील ओव्या (गाणी) घुमू लागतात. पूर्वी ग्रामीण भागात वीज नव्हती. त्यामुळे वीजेवरील पिठाच्या गिरण्या नव्हत्या. डिझेलच्या गिरण्याही अगदीच नाममात्र होत्या. चार-पाच गावांमिळून एकादी गिरणी असे. त्यामुळे इतर गावांतील लोक आठ-दहा किलोमीटरहून बैलगाड्यांत धान्य टाकून दळण्यासाठी आणत असे. साधारणतः 1970 च्या दरम्यान मोठ्या खेड्यात डिझेलच्या गिरण्या आल्या. तत्पूर्वी जात्याचाच वापर पीठ दळण्यासाठी होत असे.
हिला रोज पहाटे उठून प्रथम धान्य दळणाचे काम करीत. जाते हे दगडाचे असे. साधारतः एका किंवा दोन तासात पायलीभर धान्य होत असे. त्यानिमित्ताने महिलांना मात्र चांगलाच व्यायामही होत होता. आता हे जाते फक्त लग्नात हळद दळण्यासाठीच वापरले जाते.
पहाटे अशा प्रकारचे दळण दळत असताना विशिष्ट पद्धतीने गाणी म्हटले जात. त्यास जात्यावरील ओव्या म्हणत. आजही ही गाणी गर्भगिरीच्या कुशीत जीवंत आहेत. या ओव्या ऐकण्यास मिळतात.
या गाण्यांतून प्रामुख्याने देवाचे वर्णन, आपल्या मुला-मुलींचं किंवा धन्याचं (पतीचे) वर्णन केले जाते. शक्यतो दोघीजणी हे जाते चालवतात आणि गाणी म्हणतात. असेच मारूतीचे (हनुमान) गाणी ऐकण्यास मिळते.
राया तुझे धरीते रे पायी
आधी कर माझी सोई मंग आंघोळीला जाई
राया तुझं धरीते रे बोट
आधी कर माझी सोई मंग आंगोळीला उठ
राया तुझं धरीते धोतर
आधी कर माजी सोई मंग पायरी उतर
राया शेंडी तुझी शेंदराची
झलक्या मारीती वर फांदी लिंबोळ्याची
राया पोरामंदी खेळू नको
शेंदरी लाल झगा माती मंदी लोळू नको
ऐटीमंदी उभा कोण रांगड्या पायाचं
राजा पुत्र अंजणाबाईचा
वेशच्या बाहेरी बंगला 22 खांबाचा
राया शिष्या नांदतो नेमाचा
या गाण्यातून मारूतीरायाला विनंती करण्यात येत आहे. तुझे पाय धरीते, आधी माजी सोय कर. मगच आंघोळीला जाय. आधी माझी सोय कर, तरच पायरी उतर. अशा प्रकारचे अनेक गाण्यांतन विविध वर्णन केलेले आढळते.
अशाच पद्धतीने रामायणातील काही प्रसंगी जात्यावरील ओव्यातून बसविलेले आहेत. सिताबाईचं गाणं हे तितकेच प्रसिद्ध आहे.
अरण्या वणात कोण रडत ऐका
सीताबाई बाळांतीन बोरी बाभळी बायका
अरण्या वणात काय दिसं लाल लाल
सिताबाई बाळांतीन दिलं लुगड्याचं पाल
अरण्या वणात म्हणजे दंडकारण्य. या वणात कोण रडतं ऐका. तर सिताबाई बाळांत झालेली आहे. तिला जोडी कोण, तर बोरी, बाभळी ही झाडे. याच वणात काय लाल लाल दिसतं. तर तिसाबाईला लुगड्याचं पाल दिलेलं आहे. तेच लाल लाल दिसत आहे. असे या गाण्यातून म्हटले आहे. म्हणजेच माता सितेच्या विविध प्रसंगांचं वर्णण अशा ओव्यातून केलेले दिसचे. या ओव्या कोणी रचल्या, हे सांगता येणं कठिण आहे. मात्र एक पुस्तकही न शिकलेल्या महिलांनी हे गाणं रचलं आणि ते पुढे आईकडून मुलीला असे आतापर्यंत येत आहे, हे मात्र खरे.
जात्यावर दळणासाठी बसल्यानंतर ओव्या म्हणत असताना भरपूर काम झाले, तरी थकवा येत नसे. तुळशीविषयी प्रेम व्यक्त करताना एका ओवीतून अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे.
तुळशीबाई नको हिंडू जंगलात
पैस माझा वाडा जागा देते अंगणात
तुळशीबाई नको हिंडू रानी वनी
पैस माझा वाडा जागा देते इंद्रवणी
तुळशीच्या माळा पैशाला वीस-तीस
पुरना माझा हात विठ्ठला खाली बस
तुळशीचा पाला वारा सैतानाने नेला
देव विठ्ठलाने आवडीने गोळा केला
विठ्ठल बोल शेला कशानं फाटला
गेलो होतो बनामंदी तुळसी बेटाला गुंतला
पंढरची वाट कशानं काळी झाली
विठ्ठलाच्या माडीवर रूख्मिनी केस वाळी
अशा गाण्यातून पांडुरंगाचं आणि त्याला प्रिय असलेल्या तुळशीचं गुणगाण केलेले असते.
पावसाची गाणी ः
पाऊस भरपूर आला, तरच शेतकऱ्याचं जीनं. नाहीतर मरणही अवघड, अशी स्थिती असते. गर्भगिरीतील शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून असते. पावसाने उशिर केला, की शेतकरी परमेश्वराला साकडे घालतात. कुणी महादेवाला पाण्यात ठेवते, तर कुणी देवाला फुल लावतं; परंतु बहुतेक ठिकाणी गावाच्या शिवेवर जाऊन भजन करण्याची प्रथा आहे. हे काम पुरूष मंडळी करतात. आपल्या धन्याची पावसासाठी ही स्थिती पाहून महिला गप्प कशा बसतील. त्याही धोंडी (पाऊस) माघण्यासाठी घराबाहेर पडतात. शक्यतो सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महिला घोळक्याने प्रत्येक घरासमोर जातात. तेथे गाणे म्हटले जाते.
घरातील मालकीन या महिलांना थोडे धान्य देतात. तसेच 1-2 रूपयेही देतात. सर्व महिला गाणे म्हणत असताना संबंधित घरातील मालकीन त्यांच्या अंगावर पाणीही शिंपाडते, ही प्रथा अद्यापही चालू आहे. धोंडीचे गाणे फार मजेशिर आहे. ते पुढीलप्रमाणे ः
धोंडी बाई धोंडी
धोंडी गेल्या हटा
पाऊस आला मोठा
धोंडीच्या भाकरी भिजल्या
आमच्या कन्या शिजल्या
शिजू द्या बाई शिजू द्या
राळा पाणी पिकू द्या
मन दाणे विकू द्या
आभाळ भरलं पाण्यानी
कणग्या भरल्या दाण्यानी
असं हे धोंडीचं गाणं अत्यंत तालासुरात सर्व महिला म्हणतात. या वेळी म्हणण्यासाठी आणखी एक गाणं अत्यंत सुंदर आहे.
पडला पाऊस पडून हुसळला
भावाला झाल्या लेकी
बहिणी विसरला
पडतो पाऊस पडतो पुरवला
पिकू दे मुग राळा
बंधू माझा लेकुरवाळा
पडतो पाऊस वल्या झाल्यात जुमीनी
डोई भाकरीच्या पाट्या
शेता चालल्या कामिनी
ढग दिसतात; परंतु पाऊस काही येत नाही. या वेळी महिलांचा सूर जरा वेगळा असतो. रानात, आपल्या शेतात काम करीत असताना एक-दोन महिला एकत्र येऊन हळी देतात..
बरस रे मेघ राजा
दुणिया झाली तरसरे
आई चुकली लेकरा
गाय चुकली वासरा
हरण चुकली पाडसा
बरस रे मेघ राजा
अत्यंत भावपूर्ण असलेलेले हे गीत शेतकऱ्यांच्या अंतःकरणाची हाळी देऊन जाते.
भल्लरी ः
गर्भगिरी डोंगररांगेत सामुहिक गीत शक्यतो गवत कापणी, ज्वारी काढणीच्या वेळी गायले जाते. या गाण्यांना "भल्लरी' असं म्हणतात. या भल्लरीत देवाचं वर्णन, आपल्या लाडक्या बैलांचं वर्णन अत्यंत रोचक पद्धतीने दिले जाते. कौतुक केले जाते. ज्या वेळी इर्जिक असते. त्यावेळी सामुहिक गीत गाण्यासाठी शेतकऱ्यातील गायक हमखास जागा होतो. लोकगितांच्या ठेक्यावर विशेषतः महिलांच्या बहुतेक गाणी पाट असतात. त्या आपल्या बैलांचं कौतुक करताना म्हणतात..
हावस्या मोत्याची हितं जोडी हजाराची
जुपेव बाळ गाडी मला हावस बाजाराची
लाडकं मुल माझं आखरावरी झोपी गेलं
बैल बसू राजा यानी जागं केलं
श्रावण साखळी तुझ्या गळ्यामंदी लोळ
लाडकीबाई माझी बहिण भावामंदी खेळं
दोन्ही झाले बाळ दोन वाड्याची भिंत
लाडकी मैना माझी दरवाज्याला रंग देती
असं हे गाणं पुढं वाढतच जातं. गाणं गात असताना मात्र शेतकरी भरपूर काम करतो. तहान-भूक याची तमा नसते, हे मात्र खरे !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा