गर्भगिरी ही डोंगररांग सह्याद्रीची उपशाखा आहे. अत्यंत रम्य असलेले हे डोंगर पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहेत. या ब्लॉगमध्ये डोंगररांगेतील नाथपंथाचे महत्त्व, देवस्थाने, औषधी वनस्पती, ऐतिहासिक महत्त्व, विविध फोटो असे विविध विषयांचा समावेश आहे.
शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९
नाथ संप्रदायाची भूमी
नाथ संप्रदायाची भूमी
गर्भगिरी डोंगररांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. नाथ संप्रदायाचा उदय व विकास याच पट्ट्यात झालेला आढळतो. राष्ट्रसंत तनपुरे महाराज, भगवानबाबा, भृंगऋषी, वामनभाऊ, गव्हाणेबाबा, खंडुजी बाबा आदी संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेली मोहटादेवी याच डोंगररांगच्या मनोऱ्यात विसावलेली आहे.
नाथ संप्रदायात या डोंगररांगेला विशेष महत्त्व आहे. गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला, असा उल्लेख पुरानातून आढळतो. पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथांची समाधी, येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांची समाधी (जानपीर), राणी मैनावतीची समाधी, शिरुर कासार तालुक्यातील मानूर येथील नागनाथ, मढी येथील कानिफनाथांची समाधी, नगर बीड मार्गावरील अडबंगीनाथ, तर गोरक्षनाथांचे वास्तव्य असलेला गोरक्षनाथ गड (ता. नगर) याच रांगेत आहेत. या डोंगरांत नवनाथ फिरले. राहिले. ठिकठिकाणी विसावले. त्यांच्या लिला, चमत्कार याच भागात झाले. त्यामुळेच नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरीचा उल्लेख आढळतो.
""तुये वेळेस कोणसोण तेथ। राहिले होते एकनाथ।
विचार करोनी उमाकांत । गर्भद्रिते राहिले ।।162।।
अदृश्य अस्त्र नगी पेरून । स्वस्थाना गेला कुबेर निघून ।
तेणे नगर तो कणक वर्ण । झाकोळोनी पायी गेला ।।163।।
परि गर्भद्रि पर्वतात । वस्तीस राहिला उमाकांत ।
तो अद्यापि आहे स्वस्थानात । म्हातारदेव म्हणती ।।164।।
तयाचिये पश्चिम दिशेशी । कानिफा राहिला शिष्य कटकेशी ।
वस्ती करूनी नाम या ग्रामसी । मढी ऐसे ठेविले ।।165।।
तयाचे दक्षिण पर्वथी । राहता झाला मत्स्येंद्र यती ।
त्याहुनी पूर्वेस महिपर्वती । जालिंदर राहिला ।।166।।
आणि त्या पर्वता पैलदेशी । नागनाथ राहिला वडवानळेशी ।
आणि रेवणसिद्ध तया । महिशी विटे ग्रामी ग्रामी गोरक्ष जती ।।167।।
वामतीर्थ गर्भाद्री पर्वती । राहाता झाला गोरक्ष जती ।
सेवेसी शिष्य टेऊनी सप्तों । विद्या सांगी गहिनी ते ।।169।।
या काव्यपंक्ती श्रीधर स्वामी यांनी त्यांच्या "नवनाथ ग्रंथ' या मूळ ग्रंथात तेविसाव्या अध्यात लिहून ठेवल्या आहेत. अकराव्या शतकात नाथ होऊन गेले असल्याचा त्यात उल्लेख आहे.
भगवान शंकर वृद्धेश्वर येथे राहिले. मत्स्येंद्रनाथ, कानिफनाथ, याच गर्भगिरीत मढी परिसरात पवित्र स्थानांत विसावले. राम-सीता वनवासात असताना याच भूमीत काही दिवस वास्तव्यास होते. त्यामुळे सीतेचे स्नानगृह डोंगरगण (ता. नगर) येथे आहे. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सोनई परिसराकडून येताना ज्या ठिकाणी थांबले, ते "वामतीर्थ' वांबोरी याच रांगेच्या पायथ्याशी आहे. तेथून ते डोंगरगणला रामेश्वर जवळ आले. तेथेच सीतेचे स्नानगृह आहे.
या निसर्गरम्य परिसरात त्यांचे वास्तव्य होते. संपूर्ण महाराष्ट्राला सीतेचे डोंगरगण परिचित आहे. त्याच डोंगरपट्ट्यात गुंजाळे (ता. राहुरी) येथील डोंगरात मावलायाचे कुंड आहेत. या कुंडात दुष्काळातही पाणी असते. निघोजजवळील रांजणखळग्यांशी साधर्म्य असणारे हे कुंड किती खोल आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. गर्भगिरी डोंगररांगेसह हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून परिचित होता. दंडकारण्याचा उल्लेख पोथी-पुाणांमध्ये आढळतो. दंडकारण्य हे रामाची वनवासाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याच भागातून शंकराचा अवतार असलेले काळभैरवनाथ सोनारीजवळ असलेल्या दैत्यांचा संहार करण्यासाठी गेले. जाताना ज्या ठिकाणी थांबले, ते आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे. भुतांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले हे देवस्थान गर्भगिरीच्या कुशीत विसावलेले आहे.
याच डोंगरभागात गोमुख (पांढरीपूल), सीनाशंकर (ससेवाडी), बायजाबाई देवी (जेऊर), बहिरवाडीचा बहिरोबा, पिंपळगावची उज्जैनीमाता, बारा वर्षे फक्त लिंबाचा पाला व शेंगादाणे खाऊन तपश्चर्या केलेले आगडगाव रस्त्यावरील भृंगऋषी दऱ्यातील शेंगदाणेबाबा, संजीवनी गड, कापूरवाडीतील कानिफनाथ मंदिर, उदलमल घाटातील महादेव, ससेवाडीच्या डोंगरातील महादेवाचा दरा, सीना नदीचे उगमस्थान, आदी स्थाने दुर्लक्षित आहेत. पुढे बाळनाथ गड, करंजीच्या घाटातील गव्हाणेबाबांची समाधी, पाथर्डी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेली दगडवाडीची अंबिका, तेथील राष्ट्रसंत तनपुरे महाराजांचे जन्मगाव असलेली भूमी, देवराईजवळील बालाजी मंदिर, मढी येथील कानिफनाथ देवस्थान, अशी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.
च्या पुढे मोहटादेवी, तारकेश्वर गड, नागनाथ, गहिनीनाथ गड, अडबंगीनाथ गड, खरवंडी कासार येथील जनार्दन स्वामींची समाधी, धौम्यऋषी (भगवानगड), हरिहरेश्वर, समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती जिथे आहे, ते हनुमान टाकळी, शंखाचे मंदिर असलेली जोहारवाडी, लोहसरचा भैरवनाथ, मिरीचा विरोबा ही देवस्थाने महत्त्वाची आहेत. या प्रत्येक देवस्थानाला वेगवेगळा इतिहास आहे. तेथील दंतकथा आहेत. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पाण्याची मुबलकता आढळते. देवींच्या ठिकाणी नवरात्रोत्सवात मोठ्या यात्रा भरतात. श्रद्धा, अंधश्रद्धाही सर्व ठिकाणी आहेत. साधारणतः मार्च-एप्रिल-मेच्या दरम्यान बहुतेक दैवतांच्या यात्रा भरतात. भैरवनाथ, बिरोबा, काळुबा, म्हसोबा आदी दैवतांच्या यात्रा याच काळात भरतात. अनेक ठिकाणी पशुहत्या होत असली, तरी आता अंधश्रद्धा कमी होत आहे. त्यामळे त्या बंद होऊ पाहत आहेत.
पुजाऱ्यांची परंपरा, यात्रेतील पुजेचा मान, काठ्यांचा मान काही विशिष्ट जाती, गावचे पूर्वीचे पाटील, विशिष्ट घराणी, गावे आहे. ही प्रथा अद्यापही पाळली जात आहे. एकूणच या डोंगरपट्ट्यातील गावांमध्ये धार्मिक वातावरण चांगले आहे. हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून कीर्तन, भजने आदी कायम चालू असतात.
गोरक्ष सिद्धांमध्ये उल्लेख आहे ः
""श्रावणमासी केला भंडारा दाटी सुरवरांची अपार।
गर्भगिरी की स्वर्ग कळेना देवता करिती विचार ।।''
यावरून या गर्भगिरी पर्वतांचे महत्त्व लक्षात येते.
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात 40 अध्याय आहेत. त्यात एकूण 7600 ओव्या आहेत. ग्रंथाचा कर्ता धुंडिसूत मालुकवी हा श्रेष्ठ कवी आहे. तो नरहरी वंशातील श्रेष्ठ भक्त होता. शके 1741 मधील ज्येष्ठ महिन्यात शुद्ध प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला, असे त्यात म्हटले आहे.
रामायण आणि महाभारताप्रमाणेच श्रीमद्भागवत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये निमिराजाशी नवनारायणांचे संवाद झाले आहेत. हे नवनारायण म्हणजेच ऋषभ देवांच्या शंभर पुत्रांपैकी देवाचे नऊ श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी विविध अवतार घेतले.
स्वयंभू मनूचा पुत्र प्रियवृत्त, प्रियवृत्तचा पुत्र अग्निध, अग्निधचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र ऋषभदेव, ऋषभदेवाचे 100 पुत्र, त्यामध्ये सर्वात मोठा भरत. हा भरत मोठा पराक्रमी होता. त्याच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत असे नाव पडले. भरत राजा झाला, तेव्हा त्याच्या बरोबर 9 भाऊ राज्यकारभार पाहू लागले. 81 भाऊ कर्मकांडी झाले. उरलेले 9 जण मात्र विश्व विख्यात तपस्वी मुनी झाले. त्यांनाच नवयोगेश्वर अथवा नवनारायण असे म्हणतात. हे नवही नारायण द्वारकापुरीत उपस्थित झाले. भगवान श्रीकृष्णासमोर आल्यानंतर तेथे भगवान श्रीकृष्णाने त्यांचे पुजन करून सिंहासनावर बसविले. त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, "भगवान आमचे स्मरण करण्यामागचे प्रयोजन काय?' तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना, "तुम्ही कलीयुगात अवतार घेऊन योग विशिष्ट भक्तीचा प्रचार करा.' त्याप्रमाणे पुढील नऊ नारायणांनी नवनाथांचे अवतार घेतले.
नवनाथ म्हणजे नऊ नारायण होय.
1) मत्स्येंद्रनाथ (कविनारायण)
2) गोरक्षनाथ (हरी नारायण)
3) कानिफनाथ (प्रबुद्ध नारायण)
4) जालिंदरनाथ (अंतरिक्ष नारायण)
5) चर्पटीनाथ (विप्पलायन)
6) नागनाथ (अविर्होत्र नारायण)
7) भर्तरीनाथ (द्रुमील नारायण)
8) रेवणनाथ (चमस नारायण)
9) गहिनीनाथ (करभंजन नारायण)
कोणत्या नारायणाने कोणत्या ठिकाणी प्रगट व्हावे, याचा सविस्तर विचारही भविष्यपुराण या ग्रंथात सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वर, शिवशंकराने निवृत्तीनाथ, ब्रह्मदेवाने सोपानदेव, अदिशक्तीने मुक्ताबाई, वाल्मिक ऋषींनी तुलसीदास, कुब्ज्यादासीने जनाबाई आदींच्य रुपात कलियुगात अवतार घेऊन कार्य करण्याचे नियोजन झाले. त्यानुसार एकामागून एक असे पवित्र कुळात अवतार झाले आहेत.
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।।1।।
विष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ।।2।।
ब्रह्मा सोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ।।3।।
आदिशक्ती मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी ।।4।।
या ओळी आहेत जनाबाईच्या गाथेतील. जनाबाईने याबाबत कथन केले आहे.
गर्भगिरी डोंगररांगेत नवनाथ सांप्रादाय वाढला. नाथांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान होते. त्यामुळे त्या शक्तीच्या आधारे व संजीवनी विद्येद्वारे त्यांनी सर्वसामान्यांवर औषधोपचार केले. गर्भगिरीतील औषधी वनस्पतींमुळे याच भागात नाथांनी अनेक काळ वास्तव्य केले.
नाथ संप्रदायात तीर्थटनाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक नाथांनी तप पूर्ण झाल्यानंतर तीर्थटन केलेले आहे. तीर्थाटनामागे त्या पवित्र स्थानांचे दर्शन घेणे हा मुख्य उद्देश असला, तरी समाजातील लोकांचे मानसिक, शारीरिक दुःखे दूर करणे हाही उद्देश असतो.
नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष हे इतर संतांपेक्षा अधिक गूढ चरित्र्याचे होते. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये अधिक आकर्षण राहिले. अनेक भारतीय भाषांमधून लोककथा आणि लोकगीते रूढ झालेली आहेत. नवनाथांच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे पाच ते सात शतकानंतर "नवनाथ भक्तिसार' या ग्रंथाचे लेखन झालेले आहे. त्यामुळे आधीच प्रचलित असलेल्या कथांच्या आधारांवर "नवनाथ भक्तिसार' हा ग्रंथ तयार झालेला आहे. त्यामध्ये 40 साव्या अध्यायात गर्भगिरी डोंगररांगेत नाथ राहिल्याचा उल्लेख आहे.
शके सत्राशे दहापर्यंत । प्रकटरुपें मिरवले नाथ ।।
येऊनी आपुले स्थानांत । गुप्तरुपें राहिले ।।94।।
राहिला कानिफा जती । उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती।
जानपीर जो जालंदर जती । गर्भगिरी नांदतसे ।।95।।
त्याहूनि खालता गैबीपीर । गहिनीनाथ परम सुंदर ।
वडवाळग्रामीं समाधिपर । नागनाथ असे की ।।96।।
वीटग्रामी मानवदेशांत । तेथे राहिले रेवणनाथ ।
चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ । गुप्त अद्यापि करिताती ।।97।।
भर्तरी राहिला पाताळभुवनी । मीननाथ गेला स्वर्गालागोनी ।।
गिरनार पर्वती गोरक्षमुनी । दत्ताश्रमी राहिला ।।98।।
गोपीचंद आणि धर्मनाथ । ते स्वसामर्थे गेले वैकुंठात ।।
विमान पाठवोनि मैनावतीते । घेऊनी विष्णू गेलासे ।।99।।
पुढे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून । नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने ।।
येथूनि चरित्र झालें संपूर्ण । सर्व नाथांचे महाराजा।।100।।
गर्भगिरीबरोबरच भारतात नाथ संप्रदायाची महत्त्वाची अनेक ठिकाणे आहेत. गोरक्षत्तोर काळी गोरक्षनाथांची मंदिरे सर्व भारतात उभारली गेली. अनेक मंदिरात मत्स्येंद्रनाथ, गुरूदेव दत्त, चौऱ्यांसी सिद्धांच्या मूर्ती दिसून येतात. याशिवाय नेवाळ ते रामेश्वरपर्यंत नाथांनी या सांप्रदायाची पताका फिरविली. मंदिर, मठ यांची स्थापना केली.
ज्या ठिकाणी नाथांची स्थाने आहेत. तेथे आजही अत्यंत महत्त्व आहे. योगी मठ (मोदिनीपूर), हिंगुआ मठ (जयपूर), योगी भवन (बागुडा), चंद्रनाथ (गोवा), गोरक्ष केंद्र (गोरखपूर), अंगना मंदिर (उदयपूर), आदिनाथ मंदिर (कलकत्ता), काद्री मठ (तामीळनाडू), गोरक्षतीर्थ (गिरीनार पर्वत, जुगरात), नीलकंठ महादेव (आग्रा), नोहर मठ (बिकानेर), पीरसोहर (जम्मू), भर्तृगुंफा (ग्वाल्हेर), महामंदिर मठ (जोधपूर), योगी गुहा (दिनजापूर), हांडीभरंगनाथ (म्हैसूर) आदी ठिकाणी नाथांची स्थाने प्रसिद्ध आहेत.
या बरोबरच बीड जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या हरंगुल येथे भर्तुहरीनाथांची भस्म समाधी आहे. या समाधीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शुक्रवारी तेथे समाधीला गायीच्या शेणापासून तयार केलेल्या भस्माचा लेप लावला जातो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी येथे रेवणनाथांचे मंदिर आहे. सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथे नागनाथांचे पुरातन मंदिर आहे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे गोरक्षनाथांचे प्रचीण मंदिर आहे. येथे पंचमीच्या दिवसी नागाची पूजा होते. सर्व नाथांपैकी कानिफनाथांचे असंख्य भक्त भारतभर विखुरलेले आहेत. त्यामुळेच मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथांच्या समाधीला विशेष महत्त्व आहे.
नाथ सांप्रायादायाशी संबंधीत पर्वत ः
ष्ट्रात नाथ सांप्रदायाशी नाते सांगणारे काही पर्वत आहेत. तेथे भक्तांचा ओढा कायम असतो. नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गड हा सह्याद्रीच्या पर्वतातील एक महत्त्वाचा पर्वत आहे. या पर्वतावर पुरातन शिवमंदिर, लेणी आहेत. ते शक्तीपीठ म्हणून संबोधले जाते. याच गडावर योगी चांगदेवांचा मुक्काम होता. त्यांनी याच गडावर लिहिलेल्या "तत्त्वसार' या ग्रंथात हरिश्चंद्र गडाचा, मळगंगा प्रवाहाचा, केदारेस्वर मंदिर आणि शिवाच्या उपासणेत रमलेल्या सिद्धगणांचा उल्लेख आढळतो. आजही नाथपंतीय योगी गडावर येऊन भेटी देतात. या डोंगराच्या डाव्या बाजूला गोरक्षगड व सिद्धगड हे नाथांशी नाते सांगणारे गड आहेत.
नाशिकमधील त्रंबकेश्वर महत्त्वाचे आहे. तेथील ब्रह्मगिरी पर्वताच्या गुफेत गहिनीनाथांचे वास्तव्य होते. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना चुकून निवृत्तीनाथांनी या गुफेत प्रवेश केला. तेथे गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश करून नाथपंथाची दीक्षा दिली, अशी कथा आहे.
अंजनी पर्वत हाही नाशिक जिल्ह्यात आहे. अंजनेरी गावाजवळील ब्रह्मगिरी पर्वताला लागूनच अंजनी पर्वत आहे. नवनाथ ग्रंथात उल्लेख केलेली काही सुर्यकुंडे येथे अजूनही दिसतात. नवनाथांनी या पर्वतावर असलेल्या सुर्यकुंडात स्नान करून मार्तंड पर्वतावरील नागवृक्षास अभिषेक केला. विशेष म्हणजे हनुमानाचा जन्म याच पर्वतावर झाला. त्यामुळेच अंजनीमाता व हनुमान मंदिर येथे पुरातन काळी उभारले आहे.
गिरीनार पर्वत हा गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात आहे. मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांना याच गिरीनार पर्वतावर गुरूदेव दत्तांनी उपदेश केला, असा ग्रंथांत वृत्तांत आहे. त्यामुळेच नाथपंथीय या गडाला नाथांचे शक्तीपीठ मानतात. गिरीनार हे दत्तक्षेत्र असून पर्वताच्या शिखरावर गुरूदेव दत्तात्रयांच्या पादुका आहेत. तेथेच गोरक्षनाथांचे मंदिर असून, अहोरात्र धुनी पेटलेली असते. नाथ भक्त आयुष्यात एकदा का होईना या तीर्थ क्षेत्राला भेट देतात.
शाबरी मंत्र ः
सांब नावाच्या ऋषीने साबरी विद्या जनकल्याणासाठी निर्माण केली. नवनाथांनी या विद्येत भर घातली. विशेषतः गोरक्षनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात.
नवनाथ (9 नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.
मत्स्येंद्रनाथ
"अरे हा कविनारायण ।
च्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम।
जगामाजी मिरवी की ।।33।।
(नवनाथ ग्रंथ अध्याय 1, ओवी 33 वी)
एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.
गोरक्षनाथ
""तरी आता न लावी उशिर ।
हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र ।।
बाळ शब्द उदेला ।।75।।
(अध्या 9 वा, ओवी 75)
मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे 100 कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून 3 किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.
गहिनीनाथ
तेंगे करूनी पंचभूत।
दृश्यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत ।
प्रेरक झाला जीवित्त्वा ।।61।।
(अध्याय 10, ओवी 61)
कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.
जालिंदरनाथ
विप्रो हाते सलील बाळ ते जातें।
रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने ।
ंजुळवत रुदन करी ।।112।।
(अध्याय 11 ओवी 112)
पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.
कानिफनाथ
त्वरे येऊन कर्णदृसी।
दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी ।।
नमस्कारी प्रेमाणे ।।115।।
(अध्यय 12 वा, ओवी 115)
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.
भर्तरीनाथ
भर्तरी भंगताचि बाळ त्यांत ।
तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त ।
तेही एकांग जाहले ।।27।। (अध्याय 24, ओवी 27)
भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.
रेवणनाथ
पातला परी अकस्मात ।
येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत ।
बाळ दृष्टी देखिले ।।21।।
(अध्याय 34, ओवी 121)
ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून 10 कि.मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.
वटसिद्ध नागनाथ
असो वटवृक्ष पोखरांत ।
अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत ।
ईश्वर सत्ते संचारला ।।92।।
दिवसेंदिवस अंडात।
वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत ।
भगन लागे अंड ते ।।93।।
त्यांत तलवर पोखरांत ।
बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते ।
रक्षणाते नसेची ।।94।। (अध्याय 36, ओवी 92, 93, 94)
ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून 25 कि.मी. अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.
चरपटीनाथ
या परी बहुता दिवशी । ईश्वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।21।।
(अध्याय 38, ओवी 21)
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.
या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या 84 आहे. या शिष्यांनाच 84 सिद्ध असे म्हणतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
४ टिप्पण्या:
Khup sundar ani atishy mahtwachi mahiti denyasathi aple abhaar ani khup khup dhanyawad
🔱Om namo Adesh🔱
🔱Alakh Niranjan 🔱
श्री गुरुदेव दत्त चैतन्य नवनाथ
खूप सविस्तर माहिती आहे
राणी मैनावति समाधी स्थान कुठे आहे
टिप्पणी पोस्ट करा