गर्भगिरी ही डोंगररांग सह्याद्रीची उपशाखा आहे. अत्यंत रम्य असलेले हे डोंगर पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहेत. या ब्लॉगमध्ये डोंगररांगेतील नाथपंथाचे महत्त्व, देवस्थाने, औषधी वनस्पती, ऐतिहासिक महत्त्व, विविध फोटो असे विविध विषयांचा समावेश आहे.
शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९
ऐतिहासिक माहिती
ऐतिहासिक माहिती
उंच.. उंच गगणाला भिडणारे डोंगरशिखर... गर्द वनराई... त्यात नितळ पाण्याचे खळाळणारे निर्झर... पक्षांचा किलबिलाट.. हरणांचे बागडणारे कळप... त्यात कोकिळेची मधूर कुहू-कुहू... पाखरांचे थवे जणू शाळा सुटून मुले घराकडे बागडताहेत... हिरव्यागार डोंगरावर थंड वाऱ्याच्या संगतीनं कुणाला भटकंती आवडणार नाही... हे सर्व मिळतं श्रावण महिन्यात गर्भगिरी डोंगरावर... तिनही ऋतुत गर्भगिरीत भ्रमंती चांगली वाटते.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर ही डोंगररांग विस्तारली आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले हे डोंगर आता पर्यटकांना खुणावू लागले आहेत. राम-सीता, नवनाथ, संत, महंत, आदिशक्ती यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीला जणू निसर्गाचं वरदान मिळाले आहे. निसर्ग भरभरून या डोंगराच्या पदरात दान टाकतो. पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन ही भूमी हरित करतो. हिरव्यागार मखमलीची शाल पांघरून ही भूमी नववधूसारखी सजते ती पावसाळ्यात. या भूमीच्या या गोंडस अन् देखण्या रुपामुळेच आता लांबून पर्यटक या डोंगरांवर गर्दी करताना दिसतात.
या डोंगरांच्या अंगाखांद्यावर अनेक देवादिकांनी आपलं स्थान केले आहे. महंतांनी समाध्या घेतल्या. पूर्वीपासूनच फळा-फुलांनी बहरण्याच्या या गुणधर्मामुळेच राम-सीता या भूमीत राहिले. त्यामुळेच आता गर्भगिरी हे अधिक लोकांचे श्रद्धास्थान बनते आहे. नागमोडी वळणे घेत जाणारे घाट, या भूमीचे आभूषण झाले आहेत. उंच डोंगरांचे सोंडपे हे दागिना बनून पर्यटकांना खुनावत आहेत. गर्भगिरीची एकच मागणी आहे, ती म्हणजे एकदा तरी या भूमीच्या अंगाखांद्यावर खेळा... बागडा...
गर्भगिरीतील रहस्ये ः
निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या, तसेच वनौषधी व वन्य जीवनाने समृद्ध अशा गर्भगिऱ्या कुशीत आतापर्यंत न उलगडलेले अनेक रहस्यमय पैलू आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांची ही डोंगररांग साक्षीदार आहे.
कृष्णा व गोदावरी या दोन नद्यांच्या खोऱ्यांना जोडणारे हे डोंगर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमारेषेवर आहेत. सह्याद्री पर्वताची एक पोटशाखा म्हणून ती ओळखली जाते. नगर-बीड जिल्ह्यातील डोंगररांग "गर्भगिरी' म्हणून ओळखली जाते. अगदी नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरी असा उल्लेख आहे.
या डोंगररांगेतील शुद्ध हवा आरोग्यदायी आहे. भारताचे "सॅनेटोरिअम' म्हणून नगरचा उल्लेख ब्रिटिश सरसेनापती जनरल ऑकिनलेक यांनी केला होता. नगर शहरापासून जवळच असलेल्या कापूरवाडी तलावातील पाण्याने व कोरड्या हवामानामुळे श्वसनाचे विकार बरे होतात, असे पूर्वीपासून म्हटले जाते. हे पाणी गर्भगिरीचेच. संपूर्ण डोंगरात औषधी वनस्पती भरपूर प्रमाणात असल्याने हे शास्त्रीयदृष्ट्याही शक्य आहे. गर्भगिरीच्या या डोंगररांगेत अनेक रहस्यमय घडामोडी घडलेल्या आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी ः
अहमदनगर या ऐतिहासिक जिल्ह्यात गर्भगिरीच्या डोंगररांगेचा मोठा भाग आहे. त्यामुळे अनेक ऐतिहासिक घटना या गर्भगिरीने पाहिल्या आहेत. अनेक राजे अंगाखांद्यावर खेळवलेले आहेत. अनेक घटनांचे हे डोंगर साक्षीदार आहेत. निजामशाहीची राजधानी म्हणजे अहमदनगर शहर. पंधराव्या शतकाच्या अखेरीस, म्हणजे इ.स. 1486 मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यानंतर फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी याने 28 मे 1490 रोजी नगर शहराची स्थापना केली. निजामशाही सन 1636 पर्यंत राहिली. याच काळात अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी आदींनी या भागात वास्तव्य केले. अनेक लढाया या डोंगराच्या कुशीत झाल्या.
गर्भगिरीतील शहा डोंगरावर चांदबिबीचा महाल या नगर जिल्ह्याच्या इतिहासातील मानाचा तुरा म्हणावा लागेल. नगर-पाथर्डी रस्त्यावरून नगरपासून 12 किलोमीटर अंतरावर ही तीन मजली इमारत नजरेत भरावी अशीच आहे. मर्तझा निजामशहाचा मंत्री सरदार सलाबतखान (दुसरा) याची येथे कबर आहे. सलाबतखानाचा मृत्यू सन 1589 मध्ये झाला. पण त्याने आपल्या हयातीत 1580 मध्ये ही वास्तू बांधली. महालाभोवती दगडी तट, तलाव आहेत. "दुर्बिण महाल' म्हणूनही या महालाचा उल्लेख आढळतो. ब्रिटिशांनी या वास्तूचा उपयोग सैनिकांसाठी आरोग्य धाम म्हणूनही केला होता. महालापासून जवळच वीरभद्रचे जुने मंदिर आहे. तेथे जंगम लोक राहतात. तेथून जवळच देवगावच्या डोंगरावर राडसबा महाल आहे. याचेही बांधकाम चांदबिबी महालाच्या काळात झाले असावे, उंचावर असलेला हा महाल एकांत व निसर्गसानिध्यात आहे. टेहळणीसाठी त्याचा उपयोग होत असे. ऐतिहासिक कलावंतीनीचा महाल याच रांगेत येतो.
गर्भगिरीच्या पायथ्याशी असलेल्या कापूरवाडीच्या तलावातून भिंगारला पाणीपुरवठा होत असे. याच भागात नगरला पाणीपुरवठा करणाऱ्या खापरी नळ योजनांचे अवशेष नळ अजूनही सापडतात. अहमद निजामशहाने सरदार इखत्यार खान, कासीम खान व सिद्धी मसशेरखान यांच्याकडून खापरी नळ तयार करून घेतला होता. या तलावाबरोबरच पिंपळगावचा तलाव सन 1913 ते 23 या काळात तयार झाला.
जेऊर परिसरातील डोंगरी भागातील पाणी या तलावात अडविले गेले आहे. पूर्वी नगर शहराला तेथून पाणीपुरवठा होत असे. गर्भगिरीवरील मांजरसुंबा गड ऐतिहासिक वास्तूचा एक आदर्श नमुना आहे. गोरक्षनाथ गडाजवळ हे स्थान आहे. निजामकालीन टेहळणी केंद्र तेथे होते. उंच डोंगरावर मोठा हौद, पाण्याची मोट हाकण्यासाठी केलेला चबुतरा, जुनी वास्तू, हे तेथील वैशिष्ट्य.
ऐतिहासिक भातोडीची लढाई गर्भगिरीच्या पायथ्यालाच झाली. तेथे असलेल्या शहाडोंगर, तसेच बारादरीच्या डोंगरपट्ट्यातील पाणी तलावात अडविले जाते. 1624 मध्ये शहाजीराजांनी येथील लढाईत मोठा पराक्रम गाजविला. शहाजीराजांचे भाऊ शरिफजी याच लढाईत कामी आले.
याच डोंगररांगेत असलेल्या मढीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज (पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यात सापडले, तेव्हा येसूबाईंनी मढी येथील कानिफनाथांना शाहू महाराजांच्या सुटकेसाठी नवस केला. त्यानंतर पाच दिवसांत त्यांची सुटका झाली. त्यामुळे नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई व शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत मढीला पाठविला व तेथे महाद्वार, नगरखाना, सभामंडप, गौतमी बारव आदींचे बांधकाम झाले. मंदिरातील पितळी घोडा व सदोदित तेवणारा नंदादीप मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बाबूराव आंग्रे यांनी दिला आहे. महिम भट्ट व चक्रधर स्वामी यांची भेट झालेले ठिकाण म्हणजे खरवंडी रस्त्यावरील तुळजवाडी (भेटीचा वड), संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजले ते खरवंडीतील महादेवाचे मंदिर परिसर याच परिसरात आहे.
याबरोबरच अनेक पौराणिक संदर्भ या डोंगररांगेत आहेत. महाभारतातील युद्धाच्या वेळी धुराळ्यामुळे हनुमानाचे तोंड काळे झाले होते. काळा मारुती हा करोडीला प्रसिद्ध आहे. अर्जुनाचा पुत्र बब्रुवाहन यांने अर्जुनाचा पराभव केला. त्यामुळे हताश होऊन अर्जुन रडला, ती भूमी म्हणजे पाथर्डीतील खोलेश्वराचे मंदिर. चांदबिबीच्या महालावरून दुलेचांदगावला केलेली पाइपलाइनचे अवशेष या परिसरात दृष्टी पडतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा