शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

पर्यटकांचे आकर्षण


पर्यटकांचे आकर्षण

सह्याद्री पर्वतरांगेचे पर्यटकांना पूर्वीपासूनच आकर्षण आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील कळसुबाई, रतनगड, हरिश्‍चंद्रगड, तसेच विविध स्थाने प्रसिद्ध आहे. हरिश्‍चंद्र डोंगरातील गर्भगिरी डोंगररांग त्यातीलच एक. विविध संत-महात्मे, देव-देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत पर्यटक कायमच आकर्षिले जातात.
गर्भगिरी डोंगरात अनेक स्थळे निसर्गाची नवलाई दाखविणारे आहेत. अनेक वनस्पती माणसांना जीवन देणाऱ्या आहेत. पावसाळ्यात तर गर्द हिरवाई, डोंगरांनी पांघरलेला हिरवा शालू, त्यावर चमकणाऱ्या फुलरुपी बुनक्‍या, खळखळ वाहणारे निर्झर, धो-धो करणारे धबधबे, डोंगर उतारावरून झेपावणारे स्वच्छ, नितळ, थंड व गोड पाणी पर्यटकांना कायम खुणावते.
या डोंगररांगेतील ठिकठिकाणचे घाट व त्यातील नागमोडी वळणे घेत जाणारे रस्ते, हे पर्यटकांच्या कॅमेरॅत केव्हाच बंद होतात. वांबोरी घाट, पांढरीपूल, देवगाव घाट, करंजी घाट, चेकेवाडीचा घाट, वृद्धेश्‍वर घाट, वीरभद्र घाट, महिंदा घाट, येवलवाडीचा घाट, मोहो घाट, मोहरी घाट, तारकेश्‍वराचा घाट, करोडीचा घाट, कोल्हार घाट, गहिनीनाथ गडाचा घाट या घाटांचा त्यात उल्लेख करावा लागेल. या घाटांत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने गर्द झाडी आहे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगणजवळील गोरक्षनाथगड (ता. नगर) ते बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या गावांपर्यंत सुमारे 160 कि.मी. या रांगेचा पसारा आहे. समुद्रसपाटीपासून गोरक्षनाथ गड 2 हजार 982 फूट उंचीवर आहेत, तसेच आगडगावजवळील डोंगर 3 हजार 192, मढीजवळील डोंगर 2 हजार 922, तर पाथर्डी व त्यापुढील डोंगर साधारणतः 1 हजार 892 फूट उंचीचे आहेत. त्यामुळे येथील वातावरण अधिक विलोभणीय आहे.
पर्यटनस्थळांपैकी डोंगरगण, गोरक्षनाथ गड, चांदबिबी महाल, राडसबा, या स्थळांकडे पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बाळनाथ गड, सातवड डोंगर, ढोलेश्‍वर, उत्तरेश्‍वर (करंजी), तारकेश्‍वर, वडगावचे तुळजाभवानी मंदिर, मानूरचे नागनाथ देवस्थान येथेही पर्यटक भेट देतात. सातवड येथील लेण्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. डोंगररांगेतील तलुसलुशीत गवतावर ताव मारणारे हरणांचे कळप, लुटुलुटू पळणारे ससे पाहून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कापूरवाडी आणि पिंपळगावच्या तलावात रोहित पक्षांचे आगमन झाल्यानंतर हौशी पक्षीप्रेमी तेथे येऊन ठाणच मांडतात, तर मीरावली पहाडावरून अनेकजण पॅराग्लायडिंगचा आनंद घेतात, प्रशिक्षण घेतात. याच डोंगराच्या कुशीत वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण जातात.
पाऊस पडल्यानंतर रौद्र रुप धारण करणारा गुंजाळे (ता. राहुरी) येथील डोंगरातील धबधबा, त्याच परिसरातील बोकडदरीतील धबधबा, चोरगादीजवळील डबके, आगडगावच्या डोंगरातील गिधाडखोरी, जाई (रांजणी) भागातील धबधबा, मायंबाचा धबधबा, बाळनाथ गडाजवळील आनंद दरीतील धबधबा, तारकेश्‍वर, कोल्हूबाईजवळील धबधबा, अशी अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
वृद्धेश्‍वरच्या डोंगरात, तर श्रावण महिन्यात भक्त व पर्यटकांची मोठी गर्दी होते. तेथील निसर्गाचे सुंदर रुप पाहण्याची अनुभुती पर्यटक अनुभवतात. तशाच निसर्गाच्या छटा येवलवाडी (ता. पाटोदा) येथून डोंगरीकिन्हीकडे जाताना लागणाऱ्या डोंगरात दिसतात. तेथे डोंगर तुटल्यासारखा भासतो. जालिंदरनाथजवळील डोंगरातच असलेल्या तलावात काचेसारखे पाणी चमकताना रस्त्यावरून जाणारा पर्यटक थबकतो.

पशुपक्ष्यांचं माहेरघर ः
गर्भगिरीच्या कुशीत ठिकठिकाणी असलेल्या जिवंत पाणवठ्यांमुळे अनेकविध पशुपक्षी आढळतात. गर्भगिरी डोंगरात असलेल्या विविध वनस्पती, अनुकुल हवामान यामुळे अनेक पक्षी स्थलांतर करून येथे येतात.
या विविध वनस्पतींमुळे आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणवठ्यांमुळे वन्य पशु-पक्ष्यांचेही ही डोंगररांग माहेरघर आहे. तीनही ऋतुत खाण्यास फळे-फुले, भेटत असल्याने चिमण्या, कावळे, गिधाडे, साळुंक्‍या, सुतार, पोपट, कोकिळा, पारवा, करकोचा, बगळा, रोहित पक्षी, कोळसा, वटवाघूळ, पावश्‍या , मोर, लांडोर, घुबड, टिटवी, घार, ससाणा आदी पक्षी हमखास भरारी घेताना दिसतात. कोतवाल, माळटिटवी, काक्षी, बुलबुल, शिंपी, कोकीळ आदी पक्ष्यांचा चिवचिवाट कायम ऐकू येतो.
हिवाळ्यातही स्थलांतरित शेकाट्या, पांढरा धोबी, ब्राह्मणी बदक, पिंटेल बदक, चमचा, काळा सराटी, कांडे करकोचे आदी पक्ष्यांची गर्दी होते.
युरोपमधून बोरड्या हजारोंच्या थव्यांनी येथे येतात. त्यांच्या हवाई कसरती विसेष प्रेक्षणीय असतात. ज्वारीच्या हुरड्याच्या दिवसात तो मटकाविण्यासाठी येणाऱ्या मुनिया पक्ष्यांचे थवेही येथे आढळतात.
पिंपळगाव माळवी तलावावर माळढोक (ब्लॅक स्टोर्क) व पांढरा करकोचा हे दुर्मिळ पक्षीही दिसून आले होते.
खाण्यास विविध अन्न मिळत असल्याने वन्य प्राणी चिंकारा, काळवीट, लांडगे, कोल्हे, रानमांजरी, तरस, खोकड, ससे आदी वावरताना दिसतात, तर घोरपड, साप, सापसुरुळी, सरडा, घोयऱ्या सरड, पाल आदी सरपटणारे प्राणीही आढळतात.
या सर्व पशुपक्ष्यांना बाराही महिने पाणी असलेले पाणवठे जीवन देतात. मांजरसुंबा डोंगरातील टाके, गुंजाळे शिवारातील मावलायाचे निसर्गनिर्मित रांजणखळगे, सिनाशंकर (ससेवाडी), वाघजाई, भैरवनाथ तलाव (आगडगाव), जाईची धार (रांजणी), आनंददरी (करंजी), वृद्धेश्‍वर (ता. पाथर्डी), नागनाथजवळील डोंगरदरी, जानपीर तलाव (ता. पाटोदा) येथील पानवठे वर्षानुवर्षे या रानपाखरे, वन्य पसुपक्ष्यांना पाणी देत आहेत. त्यामुळे डोंगरात कायम पशुपक्ष्यांचे आवाज, किलबिलाट अनुभवता येतो.
अंधारात या डोंगररांगेत फेरफटका मारला, तर प्राण्यांचे चमकणारे डोळे, दऱ्या खोऱ्यांतून चमकणारे काजवे, रातकिड्यांचे आवाज माणसाला भुरळ घालतात, तर कोल्ह्यांची कोल्हेकुई कायम चालूच असते.

"प्रतिमहाबळेश्‍वर'
गर्भगिरी डोंगररांगेत योग्य नियोजन, पाणलोट क्षेत्र विकासकामे, पर्यटन विकास झाल्यास ही डोंगररांग महाराष्ट्राची "दुभती गाय' होऊ शकेल. प्रतिमहाबळेश्‍वर म्हणून या भागाकडे पाहिले जाईल.
गर्भगिरी शब्दाचा अर्थ होतो, गर्भ म्हणजे मध्यभाग व गिरी म्हणजे पर्वत. या डोंगरांच्या बाजूला सुमारे 100 ते 300 किलोमीटरपर्यंत दुसरे डोंगर नाहीत. उत्तरेकडील भागात गोदावरी खोरे, तर दक्षिणेकडील भागात कृष्णा खोरे आहे. डोंगरावर पडलेल्या पावसाचे निम्मे पाणी गोदावरी खोऱ्यात, तर निम्मे कृष्णा खोऱ्यात जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ गर्भगिरीतील ग्रामस्थांनाच नव्हे, तर या दोन्ही खोऱ्यांतील लोकांना होतो. पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, शिक्षणापासून दूर, पारंपारिक पद्धतीने शेती आदींमुळे या पट्ट्यातील लोकांची सुधारणा वेगाने होऊ शकत नाही. औषधी वनस्पतींचा खजिना असूनही अज्ञानामुळे त्याचा वापर होत नाही, ही शोकांतिका आहे.
या भागातील पाथर्डी, आष्टी तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार उपजिविकेसाठी इतरत्र जातात. माणिकदौंडी भागातील लोकांकडे कोळसा कामगार म्हणून पाहिले जाते, तर इतर भागातील लोक शेतमजूर आहे.
जगाच्या नकाशावर या डोंगररांगेचे स्थान साधारणतः अक्षांश उत्तर 18 डिग्री 20 मिनिटे ते 19 डिग्री 59 मिनिट असे आहे, तर रेखांश पूर्व 73 डिग्री 40 मिनिट ते 75 डिग्री 43 मिनिटे या दरम्यान आहे. या पट्ट्यातील हवामान चांगले असते.
या भागात साधारणतः कमाल 42 अंश सेल्सिअस व किमान आठ अंश सेल्सिअस तापमान असते, तर आर्द्रता 34 ते 81 टक्के दिवसा आणि रात्री 17 ते 24 टक्के इतकी असते. त्यामुळे पिके, आरोग्य, वनस्पतींना हे वातावरण चांगले आहे. या निसर्गनिर्मित बाबींचा लाभ घेऊन या भागाचा विकास चांगला होऊ शकतो. या डोंगरात पडणारे पाणी अडवून ते जिरविल्यास किंवा त्याचा साठा मोठ्या प्रमाणात केल्यास त्या भागातील लोकांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. शिवाय पर्यटनासाठी ही डोंगररांग महाराष्ट्राला खुणावेल. पर्यटनवाढीमुळे ग्रामस्थांनाही उपजिविकेचे साधन वाढू शकेल.

जलसंधारण ः
डोंगरी भागात वन खाते, कृषी खाते, वॉटर, इंडो-जर्मन, नाबार्ड, तसेच इतर पाणलोट विकास संस्थांनी यापूर्वी विविध कामे केली असली, तरी ती तोडकी आहेत. प्रत्येक डोंगरावर चर खोदून पाणी अडविणे गरजेचे आहे. तसेच वृक्षारोपणाची व्यापक मोहीम घेणे गरजेचे आहे. डोंगरात असलेल्या मोठमोठ्या नाली सिमेंट बंधाऱ्याने अडविल्यास पठारावरील व डोंगरातील पाणी डोंगरातच जिरेल. त्याचा फायदा विहिरींना व वनस्पतींच्या वाढीसाठी होईल. डोंगरांच्या पायथ्याला असलेल्या भू-भागाचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे प्रत्येक ऐकरमध्ये किमान दोन गुंठे आकाराचे शेततळे झाल्यास पाणीसाठवण मोठे होऊ शकेल.
डोंगरावर पडलेले पाणी बंधारे, शेततळी आदींच्या माध्यमातून अडविले गेले पाहिजे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, भू-जलतज्ज्ञ प्रा.डॉ. बी. एन. शिंदे यांनीही या भागाच्या विकासाबाबत अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.
आयुर्वेद संशोधन ः
या डोंगरात असलेल्या विविध औषधी वनस्पतींचे संशोधन होऊन त्यांची चांगल्या प्रकारे ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संशोधन व्हावे. सरकारने हा डोंगर संरक्षित करून त्याचा विकास केला, तर हे शक्‍य आहे. आयुर्वेद वनस्पतींवर संशोधनासाठी शासनाने संशोधकांना मानधन देऊन या कार्याला चालना द्यावी, से झाल्यास या वनस्पती जागतिक बाजारपेठेतसुद्धा जाऊ शकतील. वनस्पतींचे व्यावसायिकीकरण झाल्यास करोडो रुपयांचे उत्पन्न हे डोंगर मिळवून देऊ शकतील.

पर्यटन विकास ः
या डोंगररांगेत विविध पर्यटनस्थळे आहेत; परंतु पर्यटकांना त्यांची विशेष माहिती नसल्याने ते दुर्लक्षित राहिल आहेत. त्यासाठी प्रत्येक पठारी भागातून आणि डोंगराच्या महत्त्वाच्या भागातून रस्ते होणे गरजेचे आहे. शहरातील अनेकांना आठवड्यातून एक दिवस तरी ग्रामीण भागात, शुद्ध हवेत, निसर्गाच्या सानिध्यात राहू इच्छिणाऱ्यांची सोय होऊ शकेल. त्यासाठी शासनानेच ठिकठिकाणी विश्रामगृहे तयार केल्यास कमी खर्चात हा आनंद मिळविता येईल. गिरिभ्रमण करणारे, औषधी वनस्पतींचा अभ्यास करणारे, तसेच पर्यटकांना या विश्रामगृहांचा फायदा होऊ शकेल. पर्यायाने हॉटेल व्यवसाय वाढीस लागून स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकेल.

दुग्धव्यवसायास चालना ः
डोंगरी पट्ट्यात चांगली जमीन योग्य हवामानामुळे दुग्धव्यवसाय चांगला चालू शकतो. या डोंगरातील पौष्टिक चाऱ्यामुळे "कमी चाऱ्यावर दूध' अशी उक्ती प्रचलित झाली आहे. शहराजवळील किंवा बागायती पट्ट्यातील जनावरांना मिळणारा चारा हा विविध रासायनिक खतांचा मारा करून तयार केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या दुधातही त्याचे अंश उतरू शकतात; परंतु डोंगरी गाई-म्हशींना मिळणारा चारा हा डोंगरातील गवत, कडबा, डोंगरातील विविध वनस्पती अशा स्वरुपात मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे येथील जनावरांपासून मिळणारे दूध अधिक चांगले समजले जाते. या व्यवसायास अनुकूल परिस्थितीमुळे शासनाने दुग्धव्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देऊन हा व्यवसाय वाढविता येऊ शकेल.

पवनऊर्जा ः
पवनऊर्जेसाठी लागणारे अनुकूल हवामान या डोंगरांवर आहे. त्यामुळे पवनऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. ते पर्यटनाच्या दृष्टीनेही उपयुक्त होत आहेत.

शैक्षणिक विकास ः
शिक्षण हा विकासाचा आत्मा असतो. त्यामुळे डोंगरपट्ट्यातील मुलांना चांगले शिक्षण दिले, तर ते या भागाचा विकास अधिक करू शकतील. आधुनिक पद्धतीने शेती होऊन त्यांच्या राहणीमानामध्ये त्या फायदा होऊ शकेल.
गर्भगिरीच्या विकासासाठी विविध संत-महात्मे, राजकारणी मंडळींच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. गर्भगिरीच्या डोंगरांत वनौषधींमुळे नाथ संप्रदाय स्थिरावला. आताही विविध साधूसंत आपल्या कर्तृत्वाने समाजप्रबोधन करीत आहेत. या भागाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. वृद्धेश्‍वर देवस्थान येथीलविजयनाथ बाबा आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. धार्मिक प्रबोधन त्यांच्यामुळे होते. शहा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शहापूरचे दत्त दिगंबर महाराज हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. परिसराच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन असते.
सातवड (ता. पाथर्डी) येथील ज्ञानानंद महाराजांनी त्या परिसरातील निसर्ग फुलविला आहे. ग्रामस्थांना धार्मिक बळ देऊन व्यसनमुक्तीचे महान कार्य करणारे ज्ञानेश्‍वर माऊली कराळे हे करंजीच्या घाटातील मठात असतात. राष्ट्रसंत (कै.) कुशाबा महाराज तनपुरे यांनी 1972 मधील दुष्काळात अन्नदानाच्या माध्यमातून गावे जगविली. गहिनीनाथ गडावरील (कै.) संत वामनभाऊ यांनी पशुहत्याबंदीसाठी मोलाची कामगिरी केली. भृंगऋषी दऱ्यातील शेंगदाणेबाबा, तसेच ज्ञानेश्‍वरी मुखोद्‌गत असलेले , वारकरी संप्रदायाला गती देणारे व ज्ञानेश्‍वरीचे तत्वज्ञान सांगणारे मुकुंदकाका जाटदेवळेकर, प्राचीन वारसा जपणारे व शिव उपासक नागनाथ देवस्थानजवळील गुरु विरुपाक्ष स्वामी महाराज आदींचे या डोंगररांगेसाठी महत्त्वाचे योगदान आहे. करंजी, मोहटा परिसर, पाटोदा तालुका, शिरुर कासार तालुक्‍यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विविध ठिकाणी हायस्कूल सुरू आहेत. त्यामुळे येथील मुलांना शिक्षण मिळत आहे. गर्भगिरी रांगेतील विविध पर्यटनस्थळांना "क' वर्ग दर्जा मिळू लागला आहे. अशाच प्रकारचा दर्जा गर्भगिरीतील इतर संस्थांना मिळणे गरजेचे आहे. या भागातील संपूर्ण रस्ते डांबरी होणे गरजेचे आहे, तसेच ग्रुप ग्रामपंचायतीऐवजी सर्व गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा. सध्या वाहतुकीची वर्दळ नसल्याने चांगले रस्ते नाहीत व रस्ते चांगले नसल्याने वाहतूक नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यासाठी रस्ते चांगले होणे आवश्‍यक आहे. विकास निधी वापरताना हा निधी इतरत्र न वळविता डोंगरी विकासासाठीच वापरला गेला पाहिजे.
हे काम झाले, तर खऱ्या अर्थाने गांधीजींचे "खेड्याकडे चला' हे स्वप्न साकार होऊ शकेल."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती' या ओवीनुसार वृक्ष हेच आपले पिढ्यान्‌ पिढ्यांसाठी सगे सोयरे आहेत. त्यांची जपवणूक केल्यास ते आपली जपवणूक करतील. या डोंगरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. ज्ञानोबा - तुकोबांचा वारसा सांगणाऱ्या उपासकांनी या ओवीचा अर्थ आचरणात आणण्याची खरी गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: