मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०१९

शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१९

अन्नछत्रांची कमाल

गर्भगिरी डोंगररांगेतील देवस्थानांमध्ये गेल्या दहा वर्षांत मोठे बदल झाले. देवस्थानांचा विकास झालाय. अन्नछत्र सुरू झाले. या उपक्रमांमुळे भाविक, पर्यटक अधिक वाढला आहे. अन्नछत्र सुरू करण्याचा श्रीगणेशा आगडगावच्या काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ झाला. गेल्या १५ वर्षांपूर्वी बाजरीची भाकरी आणि आमटी असा महाप्रसाद सुरू केला. महाप्रसाद म्हणजे पोटभर जेवण. अगदी मांडी घालून भाकरी चुरून खायची. त्यासोबत कांदा, लिंबू, गोड पदार्थ, हिरव्या मिरचीचा चरचरीत ठेचा हेही पदार्थ असतात. त्यामुळे जेवण अगदी पोटभरून होते. सध्या प्रत्येक रविवारी सुमारे दहा हजार लोक जेवण करतात, ही गोष्ट गर्भगिरीच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह आहे. त्यानंतर इतर देवस्थानांनीही प्रसाद देण्याचे सुरू केले. गोरक्षनाथ गड, मढी, मोहटा देवी, मच्छिंद्रनाथ गड आदी ठिकाणी अन्नछत्र सुरू झाले. आलेल्या भाविकांना जेवण मिळते. जेवणासाठी इतरत्र हाॅटेलमध्ये जाण्याची गरज नाही. असेच अन्नछत्र सुरू झाल्याने देवस्थानकडे भाविक अधिक वळत आहे. अन्नछत्राचा सर्वात यशस्वी उपक्रम आगडगावचा आहे. कारण तेथील पोटभर जेवण हे भाविकांचे विशेष आकर्षण ठरले आहे.

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८

नगरची भूमी संतांची. तसेच योद्‌ध्यांचीही. विविध राजवटीच्या रक्ताने माखलेल्या या भूमीचा इतिहासही तसा रक्तरंजीत म्हणावा लागेल. कारण अनेक लढाया या मातीने झेलल्या. अंगाखांद्यावर योद्‌ध्यांनी आपले कसब पणाला लावले. गतप्राण झाले अन्‌ अनेक जिंकलेही. संघर्षमय इतिहास असलेल्या या जिल्ह्याला पौराणिक संदर्भही आहेत. अगदी रामायम, महाभारतापासून ते राष्ट्रकुट वंश, चालुक्‍य, निजामशाही, मराठ्यांचे राज्य, इंग्रजी राजवटीची झालर त्याला आहे. 

पौराणिक संदर्भ 

नगर जिल्ह्याचे पौराणिक संदर्भ पाहिल्यास रामायण, महाभारतात काही संदर्भ जिल्ह्याशी निगडित आहेत. अगस्त्य ऋषींनी विंध्य पर्वत ओलांडून गोदावरी तीरी वास्तव्य केले. श्रीरामपूर तालुक्‍यातील दायमाबाद येथील उत्खननातून सिंधू संस्कृतीचे अस्तित्व येथे असल्याचे सिद्ध झाले. डोंगरगणमधील श्रीराम, सीतेचे वास्तव्य, महाभारतातील अर्जुन रडल्याने पार्थ-रडी म्हणून नाव पडलेले पाथर्डी याच जिल्ह्यातील. 

नवनाथ संप्रदाय 
नवनाथ संप्रदाय याच जिल्ह्याच्या भूमीत अनेक काळ वास्तव्यास राहिला. गोरक्षनाथांची कर्मभूमी, कानिफनाथांची समाधी याच भूमीत आहे. नाथांनी ठिकठिकाणी वास्तव्य केल्याच्या खूना आहेत. देवादिकांची भूमी म्हणून गर्भगिरी पर्वतराईतील काही भाग नगर जिल्ह्याच्या भूमीचेच अंग आहे. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथांचे वास्तव्य, ज्ञानेश्‍वरीची रचना आदी संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली भूमी नगर जिल्हा राज्यभरात प्रसिद्ध आहे. 

सम्राट अशोका - राष्ट्रकुट वंश 
(इ. स. 240 ते 1000) 

सम्राट अशोकाच्या काळात (इ. स. 240) पैठणजवळील महत्त्वाचे स्थान म्हणून हा प्रांत (नगर) प्रसिद्ध होता. पुढे वाकाटक राजवंश इ. स. 250 च्या दरम्यान होता. त्याची राजधाणी वत्सगुल्म (सध्याचा वासिम जिल्हा) येथे होती. नंतरच्या काळात इ. स. 753 ते 982 दरम्यान राष्ट्रकुट राजवटीतील राजांनी राज्य केले. या काळातील राजा अमोघवर्षा याच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. याच काळात वेरुळच्या लेण्या कोरण्यात आल्या. सह्याद्रीच्या डोंगररांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतराईत या लेण्या कोरल्या गेल्या. औरंगाबादजवळची वेरुळची लेणी ही राष्ट्रकुट राजांची कला क्षेत्रातील अनुपम देणगी आहे. या गुफेत बौद्ध, हिंदू, जैन धर्मातील देव-देवतांची शिल्पे आहेत. या लेण्यातील 12 ते 34 पर्यंतच्या लेण्यांमध्ये रामेश्‍वर (सिताची नहाणी), दशावतार, कैलास, इंद्रसभा नावांनी काही लेण्या प्रसिद्ध आहेत. त्याच काळाचा संदर्भ डोंगरगण (ता. नगर) येथील रामेश्‍वर (सिताची नहाणी) येथील असावा. तसेच याच काळात करडवाडी (ता. पाथर्डी) येथेही लेणी कोरण्याचा प्रयत्न झाला होता. महादेवाच्या पिंडीच्या आकाराची गुफा आजही आहे. सह्याद्रीची जशी सातमाळ पर्वतरांग आहे. तशीच गर्भगिरी पर्वतरांगही सह्याद्रीचीच शाखा आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगेत त्याच काळात लेण्या कोरण्याचा प्रयत्न झाला असावा. राष्ट्रकुट वंश हा कलाप्रिय होता. राज्याच्या मोठ्या विभागाला राष्ट्र म्हणत. राष्ट्रकुट घराण्याचे तीन घराणे प्रसिद्ध होते. त्यातील तिसरे घराणे औरंगाबाद परिसरात उदयास आले. या घराण्याचा राजा दंतीदुर्ग (इ. स. 758) हा विख्यात होता. त्याने दक्षिण गुजरात, महाराष्ट्र, विदर्भ जिंकून 45 वर्षे राज्य केले. 
--- 

यादव - निजामशहा 
(इ. स. 1000 ते 1500) 

पुढे 1190 पर्यंत पुन्हा पश्‍चिमी चालुक्‍य वंशाच्या राजांनी राज्य केले. हरिश्‍चंद्र गडावरील गुहांचे काम, त्यावरील नक्षी त्याच शैलीतील आहे. 
1190 च्या दरम्यान देवगिरी यादवांनी चालुंशी संघर्ष करून मिळविली. 
सध्याचे दौलताबाद (जि. औरंगाबाद) ही यादवांची राजधानी होती. याच 
काळातील यादवांचे मंत्री हेमाडी यांनी मोडी लिपीचा शोध लावला. नगर जिल्ह्यात सुमारे 26 मंदिरे हेमाडपंती आहेत. रतनवाडीचे (अकोले) अमृतेश्‍वराचे मंदिर हे हेमाडपंती बांधकाचा उत्कृष्ठ नमुना होय. त्यांचे अस्तित्व आजही आहे. संत ज्ञानेश्‍वरांनी ज्ञानेश्‍वरी लिहिताना यादव वंशातील राजा रामदेवराय यांच्या नावाचा उल्लेख केल्याचे आढळते. 1294 मध्ये यादवांचा पराभव करून वजीर आदिल खिलजीने राज्य मिळविले. अर्थात हे राज्य मुघल बादशहा जलालुद्दीन खिलजी यांच्या ताब्यात आले. पुढे 1318 पर्यंत मुघल साम्राज्याचा विस्तार होत गेला. 
1338 मध्ये दिल्लीचा बादशहा मोहंमद तुघलकाने दौलताबाद सोडले. राजाविना राज्य झाले. त्यामुळे मंत्र्यांनी लुटालूट केली. त्यातील गंगू ब्राह्मण याचा शिष्य अलादिन हसन गंगू याने सर्वांना हरवून राज्य स्थापन केले. त्यामुळे हे राज्य बहामनी राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. बहामनी राज्याचा काळ मोठा होता. या साम्राज्यातील 13 राजांनी सुमारे दीडशे वर्षे या भूमीवर राज्य केले. त्या काळातही कट-कारस्थाने करण्यात राज्यातील मंत्री कमी नव्हते. 1460 नंतर 1472, 73 मध्ये मोठा दुष्काळ पडला. या आपत्तीचा सामना करण्यात प्रधानमंत्री मोहंमद गवान असफल झाला. लगेचच त्याच्याविरोधात इतर मंत्र्यांनी कारस्थाने रचली. 1487 मध्ये त्याला मारण्यात आले. अंतर्गत बंडाळी वाढून बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यातूनच निघालेल्या मलिक अहमदशहा बिहरी याने 1490 मध्ये सीना नदीकाठी वसाहत स्थापन केली. तेथेच अहमदनगर वसण्यास सुरवात झाली. अहमदशहाच्या नावावरूनच अहमदनगर हे नाव पडले. 28 मे 1490 रोजी कोटबाग निजाम हा राजवाडा बांधून नगरची स्थापना झाली. तो म्हणजे आजचा भुईकोट किल्ला होय. 1494 मध्ये शहर स्थापन झाले. पुढे निजामशहाची राजधानी बनले. 

बुऱ्हाणशहा - चांदबीबी 
(इ. स. 1500 ते 1600) 

1508 मध्ये अहमदशहाचा मृत्यू झाला. त्याचा मुलगा पहिला बुऱ्हाणशहा सात वर्षांचा असताना गादीवर आला. त्याचे बहुतेक आयुष्य लढण्यात गेले. 1553 मध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला पाच मुले होती. त्यातील थोरला मुलगा हुसेनशहा पहिला हा गादीवर आला. या वेळी त्याच्याशी त्याच्या भावांचे भांडण सुरू झाले. याच काळात विजापूर, गोवळकोंडा व विजापूर येथील राजांनी नगरला वेढा दिला. या वेळी तह झाला. पुढील एका लढाईनंतर त्याचा मृत्यू झाला. 
चांदबीबी ही हुसेनशहाचीच मुलगी. तिचा विवाह आदिलशहाशी झाला. 1555 मध्ये चौथा निजाम मुर्तझा हा गादीवर आला. त्याने सलाबतखान (दुसरा) याची वजीर म्हणून नेमणूक केली. सलाबतखानाने नगरला पाण्यासाठी खापरी नळ योजना तयार केली. त्याचे काम पाहून प्रजेला तो आवडत असे. त्यानेच शहा डोंगरावर अष्टकोनी महाल बंधला. चांदबिबीचा महाल म्हणून तो आजही सुस्थितीत आहे. सलाबतखानाच्या मृत्यूनंतर महालात त्याची कबर करण्यात आली. 

चांदबीबी 

चांदबीबी ही अहमदनगरचा निजामशहा पहिला हुसेनशहाची मुलगी. विजापूरच्या पहिल्या आदिलशहाची पत्नी. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की या भाषा अवगत होत्या. आदिलशहाच्या मृत्यूनंतर (1580) आदिलशाहीत अंतर्गत संघर्ष सुरू झाला. सुमारे दहा वर्षे हा संघर्ष चालला. आदिलशाहीची थोडी घडी बसविल्यानंतर चांदबीबी अहमदनगरच्या निजामशाहीत परत आली. हुसेनचा मुलगा मुर्तझा पहिला हा लहानपणीच गादीवर (1586 ते 89) बसला. त्याचा मुलगा मिरनशहा याला गादीवर बसविले. तो व्यसनी असल्याने त्याचा चुलतभाऊ इर्सल शहाला 1589 मध्ये गादीवर बसविले. मुर्तझाच्या बुऱ्हाण नावाच्या भावाचा हा इर्सल शहा मुलगा. इर्सलचा मृत्यू 1594 मध्ये झाल्यानंतर त्याचाच भाऊ इब्राहिम शहाने सूत्रे हाती घेतली. त्याच्या दरबारात दुफळी झाल्याने विजापूरकरांशी त्याचे युद्ध झाले. युद्धात त्याचा मृत्यू झाला. फक्त चारच महिने त्याला राज्य करता आले. त्यानंतर वजीर मियान अंजू याने अहमद नावाचा आपला मुलगा गादीवर बसविला. 1595 मध्ये हा अहमद गादीवर बसला. तो निजामाचा वारीस नव्हता. हा वाद प्रजेत सुरू झाला. त्यामुळे त्याने दिल्लीकर अकबराचा मुलगा मुराद याच्या मदतीने नगरास वेढा दिला. या वेळी अहमदशिवाय इतर तिघेजण निजामशाही राज्यावर आपला हक्क सांगत होते. त्यापैकी बहादूर नावाच्या हक्कदारास चांदबीबीचा पाठिंबा होता. मुरादने वेढा दिला, त्यावेळी चांदबीबीनेही युद्धात भाग घेऊन 1595 मध्येच सत्ता ताब्यात घेतली. चांदबीबीने इब्राहिमचा पुत्र बहादूरशहाला गादीवर बसविले आणि स्वतः कारभार हाती घेतला. तिच्याच राज्यातील महंमद नावाच्या वजिराने मुरादला पुढे करुन तिच्या विरोधात कट कारस्थाने सुरू केली. याच दरम्यान चांदबीबी व वजीर नेहंगखान यांच्यातही वाद सुरू होता. मुराद नगरवर चाल करणार होता; परंतु त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 1599 मध्ये अकबराने दानियल यास नगरवर चाल करण्यास पाठविले. तो आल्यानंतर चांदबीबीचा वजीर नेहंगखान पळून गेला. त्यामुळे चांदबीबी एकटी पडली. याच काळात हमीद खोजा व त्याच्या मंडळींनी चांदबीबीचा खून केला. त्यामुळे नगरचे राज्य मोगलांना आयतेच मिळाले. बहादूरशहाला अकबराने कैद केले आणि नगरचा कारभार दानियल याच्याकडे 1600 मध्ये सोपविला. 

मुर्तझा - शहाजी राजे 
(इ. स. 1600 ते 1700) 
निजामशाहीतील पहिल्या बुऱ्हाणचा नातू मुर्तझा दुसरा याला निजामशाहीच्या गादीवर (1601) बसविण्यात आले. त्यावेळी निजामशाहीतील सरदार शहाजी राजे, मिआन राजू व मलिकंबर यांनी विशेष पुढाकार घेतला. मलिकंबर व राजू यांच्यात भांडणे होऊन मोगलांनी निजामशाहीवर चाल केली. मलिकंबरने तह करून राज्य राखले. राजधानी नगरहून हलवून दौलताबादला नेण्यात आली. त्याच्या वशिल्याने पुढे बरेच सरदार पुढे आले. मलिकंबरने मोगलांचा पराभव करून नगरचा प्रांत पुन्हा मिळविला. पुढे मुर्तझा व मलिकंबरचे जमेना. त्याने मुर्तझालाच पदच्युत केले. 
1607 मध्ये मलिकंबरने मुर्तझास पदच्युत करून बुऱ्हाण तिसरा यास गादीवर बसविले. एका लढाईत मलिकंबरचा मृत्यू झाला. त्यानंतर फत्तेखान वजीर झाला. फत्तेखानने बुऱ्हाणचा खून करून सर्व राज्यांसह तो मोगलांना शरण गेला. तेव्हा शहाजहानने त्याला जहागिरी दिली. निजामशाही मोगलांच्या ताब्यात होती. फत्तेखानने पुढे मुर्तझा दुसरा याला 1630 मध्ये गादीवर बसविले. निजामशाही मोगलांच्या हवाली केल्याने शहाजीस राग आला होता. त्याने आदिलशहाच्या मदतीने दौलताबादवर हल्ला केला. दौलताबाद जिंकले. त्यामुळे मोगल चिडले. त्यांनी तुंबळ युद्ध करुन दौलताबाद परत घेतले. हुसेनशहा मुर्तझाला पकडून मोगलांनी त्यांना दिल्लीला पाठविले. निजामशाही पुन्हा ताब्यात घेतली. 1633 मध्ये हुसेननंतर शहाजी राजे यांना गादीवर बसविण्यात आले. 
मलिकंबरनंतर शहाजीनेच खऱ्या अर्थाने निजामशाहीची सूत्रे घेतली होती. शहाजीने कोकणासह सर्व प्रांत परत मिळविला व परांड्यास 1634 मध्ये राजधानी केली. शहाजीपुढे डाळ शिजत नसल्याचे पाहून शाहिस्तेखानने शहाजहानला दख्खनमध्ये आणले. शहाजीला त्याने तोंड दिले. पुढेही दीड वर्षे शहाजीने मोगलांशी तोंड दिले. 

भातोडीची लढाई 

1664 मध्ये मुगल शहेनशहाने लष्कर खानला 12 लाखांचे सैन्य देऊन निजामशाही संपविण्यासाठी पाठविले. त्यास आदिलशहा 80 हजारांचे सैन्य घेऊन मिळाला. शहाजीकडे फक्त 20 हजार सैन्य होते. त्यातीलही दहा हजार सैनिक अहमदनगरच्या रक्षणासाठी ठेवून दहा हजार सैन्यासह तो लढाईस तयार झाला. 12 लाख सैन्याला पाणी भरपूर लागेल, म्हणून मुगल आणि आदिलशहाच्या सैन्याने उत्तर दक्षिण वाहणाऱ्या मेखरी (सध्या मेहेकरी, चांदबीबीच्या महालाजवळील गाव) नदीजवळ छावणी उभी केली. शहाजी राजांनी उत्तरेकडील धरणाला रात्रीच तडे पाडले. रात्रीच झोपलेल्या सैन्य असलेल्या ठिकाणी पाणी घुसल्याने या छावणीची वाताहत झाली. अनेक योध्यांना शहाजी राजांनी बंदी बनविले. या लढाईत शहाजी राजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. ही भातोडीची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. 

मराठे सरदार 
(इ. स. 1700 ते 1800) 

1759 मध्ये मराठ्यांनी जिल्ह्यावर ताबा मिळविला. या काळात पेशव्यांनी मोगलांकडून नगरचा भुईकोट किल्ला ताब्यात घेतला. 1767 मध्ये तोतया सदाशिव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्तेयांना किल्ल्यात कैद करण्यात आले होते. 1797 मध्ये भुईकोट किल्ला पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. या शतकात अनेक मराठा सरदारांनी नगरवर राज्य केले. 

इंग्रजांचे राज्य - स्वातंत्र्य संग्राम 
(इ. स. 1800 ते 1947) 
1803 मध्ये जनरल वेलस्लीने नगरच्या माळीवाडा वेशीजवळ शिंद्यांच्या फौजेचा कडवा विरोध मोडीत काढून भुईकोट किल्ल्याला वेढा दिला. आतील शिंदे फौज शरण येत नाही, हे पाहिल्यावर भिंगारच्या देशमुखाला फितूर केले. मोक्‍याची जागा पाहून हल्ला केला. त्यामळे इंग्रजांनी किल्ला जिंकला. तेव्हापासून 1818 पर्यंत इंग्रजांचे महाराष्ट्र जिंकण्यासाठी अहमदनगर हे महत्त्वाचे केंद्र होते
नगर जिल्ह्यातील त्र्यंबकजी डेंगळे, रघूजी भांगरे आदींपासून झुंजार स्वातंत्र्य योद्धांनी प्रदीर्घ लढा चालू ठेवला. 
1818 पासून लढा सुरू होता. विशेषतः 1857 पर्यंत इंग्रजी सत्ता स्थिरस्थावर झाली होती. त्या काळात नगर जिल्ह्यातून त्यांच्या विरोधात नेक नेते तयार होत होते. पेशवाईच्या अखेरच्या अराजकातून सुटका झाल्याबाबत लोकांमध्ये समाधान असले, तरी इंग्रजी अन्यायाविरोधात चीडही निर्माण होत होती. 
1857 च्या बंडाच्या वेळी जिल्ह्यातील उत्तरेकडील बंड करणाऱ्यांना पकडून त्यांचा नायनाट करण्याचा सपाटा इंग्रजांनी लावला होता. त्या काळात संगमनेर, राहुरी, पारनेर आदी भागातील कोळी, भिल्ल समाजाचे लोक शांत बसले नाहीत. त्यांनी इंग्रजांच्या विरोधात गुप्तपमे कारवाया चालूच ठेवल्या. त्या काळात भागोजी नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली सात हजारांपेक्षा जास्त युवक संघटित झाले होते
1858 च्या पुढील काळात लोकमान्य टिळकांच्या विचारांनी लोक भारावले होते. नगर जिल्ह्यातील चळवळींनी त्या काळी जोर धरला होता. या काळात बाळासाहेब देशपांडे, रा. ब. चितळे, चौकर आदी मंडळींनी केलेले कार्य गौरवास्पद होते. 1908 मध्ये सेनापती बापट परदेशातून शिक्षण पूर्ण करून मायदेशी परतले. पारनेर तालुका ही त्यांची भूमी. त्यांच्यातील क्रांतिकारक त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी पुण्यास जाऊन लोकमान्य टिळकांची भेट घेतल व पुढील दिशा ठरविली. 31 मे 1916 रोजी नगरच्या कापड बाजाराच्या मागील प्रांगणात (इमारत कंपनी) लोकमान्य टिळकांचे व्याख्यान झाले. त्यांच्या भाषणाने भारावून गेलेल्या जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. 1921 नंतरच्या काळात महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. सेनापती दादासाहेब चौधरी, रामभाऊ हिरे, भाई सथ्थ्या, काकासाहेब चिंचोरकर आदी मंडळी या काळात नगर जिल्ह्यातून महत्त्वाचे योगदान देत होती. 1930 मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहात राष्ट्रीय पाठशाळा, पेटिट हायस्कूल (संगमनेर) येथील विद्यार्थ्यांनी योगदान दिले. 1932 मध्ये झालेल्या सत्याग्रहात खुशालचंद बार्शीकर, लक्ष्मण चिंचोरकर, नवलमल फिरोदिया, दिगंबर कस्तुरे, दामोदर गद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी काम केले. याच काळातील कायदेभंग सत्याग्रहातही जिल्ह्यातील नेते पुढे होते
1942 च्या चले जाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभीा पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी. सी. घोष आदी राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या भुईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा जगप्रसिद्ध ग्रंथ पंडित नेहरूंनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. पी. सी. घोष यांनी "हिस्टरी ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन' हा ग्रंथ येथेच लिहिला. 
गांधीजींच्या काळात विविध सत्याग्रह झाले. त्यामध्ये जिल्ह्यातील नगरसह श्रीरामपूर, पारनेर, श्रीगोंदे, पुणतांबे, पेमगिरी, आश्‍वी, बेलापूर, कोपरगाव, अकोले, बेलपिंपळगाव, बोधेगाव, भिंगार अशा अनेक गावांतील कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. 
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्यदिनी भुईकोट किल्ल्याच्या फत्ते बुरजावर आचार्य नरेंद्र देव यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. याच किल्ल्यात त्यांना तीन वर्षे स्थानबद्ध करण्यात आले होते. त्याच किल्ल्यावर तिरंगा फडकावण्याचे भाग्य त्यांना लाभले.
नटतोय, सजतोय गर्भगिरी

देवस्थानांचा पर्य़टकीय दृष्टीने विकास होतोय. त्यामुळे गर्भगिरी हळूहळू नटतोय. सजतोय. मस्त पर्यटकांना मोहून टाकतोय. नगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ गड, डोंगरगण, काळ भैरवनाथांचे आगडगाव, मढीतील कानिफनाथ, मोहटा देवी आदी देवस्थानाजवळ मागील दहा वर्षांत अमुलाग्र बदल झालाय. बीड जिल्ह्यातील सावरगावचे मच्छिंद्रनाथ, येवलवाडीचे जालिंदरनाथ आदी देवस्थानांनाही शासनाकडून निधी मिळून त्यांनी कात टाकलीय. या सुंदर व रम्य देवस्थानांमुळे परिसरातील रस्तेही चांगले झालेत. त्यामुळेच आता हिरवाईचा, श्रावणसरीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यंटक येत आहेत. आपणही हा आनंद एकदा घ्यावाच...

शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९

नगर जिल्ह्याविषयी थोडेसे


नगर जिल्ह्याविषयी थोडेसे

अहमदनगर हे काना ना मात्रा ना वेलांटी ना हुकार असलेलं शहर अनेक बाबतीत आघाडीवर आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी आदी क्षेत्रातही नगर जिल्ह्याचे राज्यात वर्चस्व कायमच राहिले आहे. या जिल्ह्याला मोटी पौराणिक परंपरा आहे. रामायणाच्या काळातील दंडकारण्याचाच हा भाग. त्यामुळे राम, सीता, लक्ष्मणाची ही भूमी म्हणजे वनवासाची भूमी. वशिष्ठ ऋषी, भृंगऋषी, अगस्ती ऋषी अशा महान तपस्वींनी याच भागात तपश्‍चर्या केली. नवनाथ पंत याच भूमीत जास्त काळ स्थिरावला. अनेकांनी समाध्या घेतल्या. जगप्रसिद्ध ज्ञानेश्‍वरी या ग्रंथाला याच जिल्ह्याने जन्म दिला. संत ज्ञानेश्‍वर, संत एकनाथ, संत साईबाबा, संत दासगणू, संत मेहेरबाबा यासारख्या मोठ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातही जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच आजही राज्याच्या राजकारणाला अनेक वेळा बगल देण्याचे काम याच जिल्ह्यातून होते.अहमदनगर शहर हे जिल्ह्याच्या ठिकाणाचे शहर. ही निजामशाहीची राजधानी होती. 15 व्या शतकाच्या अखेरीस, 1486 मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यानंतर फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी याने 28 मे 1490 रोजी सीना नदीकाठी नगर शहर वसवयाला प्रारंब केला. त्यानंतरच या नगर शहराचे अस्तित्व जाणवू लागले. अहमद निजामशहा मूळचा परभणी जिल्ह्यातील पाथरी गावचा. तेथील तमाभ वल्द बहरू भट याचा तो मुलगा निजामशाही इ. स. 1663 पर्यंत टिकली. या काळात या शहराने अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलतान चांदबिबी यांच्यासारख्या शूर-वीरांची कारकीर्द पाहिली. तसेच गुजरातचा बहादूरशहा आणि अकबरपुत्र मुरादच्या आक्रमणही पाहिले. मुकमिलखान दख्खनी, सलाबतखान, चंगिझकान, मलिकंबर यांच्यासारखे मुत्सद्दी, शहा ताहिरसारखे विद्वान, राजे शहाजी भोसले, कुंवरसेन, संभाजी चिणवीस यांच्यासारखे कर्तबगार हिंदू प्रधान, शाह शरीफ, मिरावलीसारखे साधुपुरुष निजामशाहीच्या काळात होऊन गेले. निजामशहाच्या पडत्या काळात शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला मांडीवर बसवून राज्यकारभार हाती घेतला आणि परकीय आक्रमणापासून हे राज्य वाचविण्याचा प्रयत्न केला. मराठेशाहीची मूहूर्तमेढ याच काळात रोवली गेली. शहाजहान बादशहाने निजामशाहीचा समूळ नाश करून अहमदनगर मोगलांच्या ताब्यात घेतले. "निजाम - उल-मुलूक' याच्या ताब्यात नंतर अहमदनगर आले. जनरल वेलस्ली उर्फ ड्यूक ऑफ विलिंग्टन याने 12 ऑगस्ट 1803 रोजी नगर सिंद्याकडून जिंकले. इंग्रजांचा प्रत्यक्ष अंमल मात्र इ. स. 1818 मध्ये आला. 1942 च्या "चलेजाव' आंदोलनात पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल तसेच राष्ट्रीय नेते नगर किल्ल्याच्या बंदिवासात होते. जगप्रसिद्ध ग्रंथ "डिस्कव्
हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ पंडितजींनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "थॉट्‌स ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ याच शहरात लिहिला मौलाना आझाद यांचा "गुबारे खातीर' हा ग्रंथही याच भूमीत शब्दबद्ध झाला.

भौगोलिक स्थान ः
पृथ्वीवर नगरचे स्थान रेखांश 10 डिग्री 05 मिनिट ते 10 डिग्री ते 10 मिनिट असे आहे. अक्षांश 70 डिग्री 50 मिनिट असे आहे. नगरची आद्रता साधारणतः 34 ते 81 दिवसा व रात्री 17 ते 34 असते. तापमान कमाल 42 अंश सेल्सिअस,किमान 8 अंश सेल्सिअस असे आहे. नगर शहर हे पुण्यापासून 120,औरंगाबादपासून 120, नाशिकपासून 165, मुंबईपासून 278, कोल्हापूरपासून 360, बीड व सोलापूरपासून 180 कि.मी. अंतरावर आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17,048 चौ. कि.ी. आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 40,88,077 इतकी आहे. तयात पुरुष 21,06,501 तर महिला 19,81,576 असे प्रमाण आहे. म्हणजेच लोकसंख्येची घनता 240 चौ. कि.मी. आहे. त्यात साक्षरतेचे प्रमाण 75.82 टक्के आहे. नगर जिल्ह्यातून गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, कुकडी, घोड, भीमा या नद्या वाहतात. भौगोलिक क्षेत्र 17,02,000 हेक्‍टर इतके आहे.

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

पर्यटकांचे आकर्षण


पर्यटकांचे आकर्षण

सह्याद्री पर्वतरांगेचे पर्यटकांना पूर्वीपासूनच आकर्षण आहे. त्यामुळे अकोले तालुक्‍यातील कळसुबाई, रतनगड, हरिश्‍चंद्रगड, तसेच विविध स्थाने प्रसिद्ध आहे. हरिश्‍चंद्र डोंगरातील गर्भगिरी डोंगररांग त्यातीलच एक. विविध संत-महात्मे, देव-देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत पर्यटक कायमच आकर्षिले जातात.
गर्भगिरी डोंगरात अनेक स्थळे निसर्गाची नवलाई दाखविणारे आहेत. अनेक वनस्पती माणसांना जीवन देणाऱ्या आहेत. पावसाळ्यात तर गर्द हिरवाई, डोंगरांनी पांघरलेला हिरवा शालू, त्यावर चमकणाऱ्या फुलरुपी बुनक्‍या, खळखळ वाहणारे निर्झर, धो-धो करणारे धबधबे, डोंगर उतारावरून झेपावणारे स्वच्छ, नितळ, थंड व गोड पाणी पर्यटकांना कायम खुणावते.
या डोंगररांगेतील ठिकठिकाणचे घाट व त्यातील नागमोडी वळणे घेत जाणारे रस्ते, हे पर्यटकांच्या कॅमेरॅत केव्हाच बंद होतात. वांबोरी घाट, पांढरीपूल, देवगाव घाट, करंजी घाट, चेकेवाडीचा घाट, वृद्धेश्‍वर घाट, वीरभद्र घाट, महिंदा घाट, येवलवाडीचा घाट, मोहो घाट, मोहरी घाट, तारकेश्‍वराचा घाट, करोडीचा घाट, कोल्हार घाट, गहिनीनाथ गडाचा घाट या घाटांचा त्यात उल्लेख करावा लागेल. या घाटांत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने गर्द झाडी आहे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगणजवळील गोरक्षनाथगड (ता. नगर) ते बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या गावांपर्यंत सुमारे 160 कि.मी. या रांगेचा पसारा आहे. समुद्रसपाटीपासून गोरक्षनाथ गड 2 हजार 982 फूट उंचीवर आहेत, तसेच आगडगावजवळील डोंगर 3 हजार 192, मढीजवळील डोंगर 2 हजार 922, तर पाथर्डी व त्यापुढील डोंगर साधारणतः 1 हजार 892 फूट उंचीचे आहेत. त्यामुळे येथील वातावरण अधिक विलोभणीय आहे.
पर्यटनस्थळांपैकी डोंगरगण, गोरक्षनाथ गड, चांदबिबी महाल, राडसबा, या स्थळांकडे पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बाळनाथ गड, सातवड डोंगर, ढोलेश्‍वर, उत्तरेश्‍वर (करंजी), तारकेश्‍वर, वडगावचे तुळजाभवानी मंदिर, मानूरचे नागनाथ देवस्थान येथेही पर्यटक भेट देतात. सातवड येथील लेण्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. डोंगररांगेतील तलुसलुशीत गवतावर ताव मारणारे हरणांचे कळप, लुटुलुटू पळणारे ससे पाहून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कापूरवाडी आणि पिंपळगावच्या तलावात रोहित पक्षांचे आगमन झाल्यानंतर हौशी पक्षीप्रेमी तेथे येऊन ठाणच मांडतात, तर मीरावली पहाडावरून अनेकजण पॅराग्लायडिंगचा आनंद घेतात, प्रशिक्षण घेतात. याच डोंगराच्या कुशीत वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण जातात.
पाऊस पडल्यानंतर रौद्र रुप धारण करणारा गुंजाळे (ता. राहुरी) येथील डोंगरातील धबधबा, त्याच परिसरातील बोकडदरीतील धबधबा, चोरगादीजवळील डबके, आगडगावच्या डोंगरातील गिधाडखोरी, जाई (रांजणी) भागातील धबधबा, मायंबाचा धबधबा, बाळनाथ गडाजवळील आनंद दरीतील धबधबा, तारकेश्‍वर, कोल्हूबाईजवळील धबधबा, अशी अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
वृद्धेश्‍वरच्या डोंगरात, तर श्रावण महिन्यात भक्त व पर्यटकांची मोठी गर्दी होते. तेथील निसर्गाचे सुंदर रुप पाहण्याची अनुभुती पर्यटक अनुभवतात. तशाच निसर्गाच्या छटा येवलवाडी (ता. पाटोदा) येथून डोंगरीकिन्हीकडे जाताना लागणाऱ्या डोंगरात दिसतात. तेथे डोंगर तुटल्यासारखा भासतो. जालिंदरनाथजवळील डोंगरातच असलेल्या तलावात काचेसारखे पाणी चमकताना रस्त्यावरून जाणारा पर्यटक थबकतो.

पशुपक्ष्यांचं माहेरघर ः
गर्भगिरीच्या कुशीत ठिकठिकाणी असलेल्या जिवंत पाणवठ्यांमुळे अनेकविध पशुपक्षी आढळतात. गर्भगिरी डोंगरात असलेल्या विविध वनस्पती, अनुकुल हवामान यामुळे अनेक पक्षी स्थलांतर करून येथे येतात.
या विविध वनस्पतींमुळे आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणवठ्यांमुळे वन्य पशु-पक्ष्यांचेही ही डोंगररांग माहेरघर आहे. तीनही ऋतुत खाण्यास फळे-फुले, भेटत असल्याने चिमण्या, कावळे, गिधाडे, साळुंक्‍या, सुतार, पोपट, कोकिळा, पारवा, करकोचा, बगळा, रोहित पक्षी, कोळसा, वटवाघूळ, पावश्‍या , मोर, लांडोर, घुबड, टिटवी, घार, ससाणा आदी पक्षी हमखास भरारी घेताना दिसतात. कोतवाल, माळटिटवी, काक्षी, बुलबुल, शिंपी, कोकीळ आदी पक्ष्यांचा चिवचिवाट कायम ऐकू येतो.
हिवाळ्यातही स्थलांतरित शेकाट्या, पांढरा धोबी, ब्राह्मणी बदक, पिंटेल बदक, चमचा, काळा सराटी, कांडे करकोचे आदी पक्ष्यांची गर्दी होते.
युरोपमधून बोरड्या हजारोंच्या थव्यांनी येथे येतात. त्यांच्या हवाई कसरती विसेष प्रेक्षणीय असतात. ज्वारीच्या हुरड्याच्या दिवसात तो मटकाविण्यासाठी येणाऱ्या मुनिया पक्ष्यांचे थवेही येथे आढळतात.
पिंपळगाव माळवी तलावावर माळढोक (ब्लॅक स्टोर्क) व पांढरा करकोचा हे दुर्मिळ पक्षीही दिसून आले होते.
खाण्यास विविध अन्न मिळत असल्याने वन्य प्राणी चिंकारा, काळवीट, लांडगे, कोल्हे, रानमांजरी, तरस, खोकड, ससे आदी वावरताना दिसतात, तर घोरपड, साप, सापसुरुळी, सरडा, घोयऱ्या सरड, पाल आदी सरपटणारे प्राणीही आढळतात.
या सर्व पशुपक्ष्यांना बाराही महिने पाणी असलेले पाणवठे जीवन देतात. मांजरसुंबा डोंगरातील टाके, गुंजाळे शिवारातील मावलायाचे निसर्गनिर्मित रांजणखळगे, सिनाशंकर (ससेवाडी), वाघजाई, भैरवनाथ तलाव (आगडगाव), जाईची धार (रांजणी), आनंददरी (करंजी), वृद्धेश्‍वर (ता. पाथर्डी), नागनाथजवळील डोंगरदरी, जानपीर तलाव (ता. पाटोदा) येथील पानवठे वर्षानुवर्षे या रानपाखरे, वन्य पसुपक्ष्यांना पाणी देत आहेत. त्यामुळे डोंगरात कायम पशुपक्ष्यांचे आवाज, किलबिलाट अनुभवता येतो.
अंधारात या डोंगररांगेत फेरफटका मारला, तर प्राण्यांचे चमकणारे डोळे, दऱ्या खोऱ्यांतून चमकणारे काजवे, रातकिड्यांचे आवाज माणसाला भुरळ घालतात, तर कोल्ह्यांची कोल्हेकुई कायम चालूच असते.

"प्रतिमहाबळेश्‍वर'
गर्भगिरी डोंगररांगेत योग्य नियोजन, पाणलोट क्षेत्र विकासकामे, पर्यटन विकास झाल्यास ही डोंगररांग महाराष्ट्राची "दुभती गाय' होऊ शकेल. प्रतिमहाबळेश्‍वर म्हणून या भागाकडे पाहिले जाईल.
गर्भगिरी शब्दाचा अर्थ होतो, गर्भ म्हणजे मध्यभाग व गिरी म्हणजे पर्वत. या डोंगरांच्या बाजूला सुमारे 100 ते 300 किलोमीटरपर्यंत दुसरे डोंगर नाहीत. उत्तरेकडील भागात गोदावरी खोरे, तर दक्षिणेकडील भागात कृष्णा खोरे आहे. डोंगरावर पडलेल्या पावसाचे निम्मे पाणी गोदावरी खोऱ्यात, तर निम्मे कृष्णा खोऱ्यात जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ गर्भगिरीतील ग्रामस्थांनाच नव्हे, तर या दोन्ही खोऱ्यांतील लोकांना होतो. पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, शिक्षणापासून दूर, पारंपारिक पद्धतीने शेती आदींमुळे या पट्ट्यातील लोकांची सुधारणा वेगाने होऊ शकत नाही. औषधी वनस्पतींचा खजिना असूनही अज्ञानामुळे त्याचा वापर होत नाही, ही शोकांतिका आहे.
या भागातील पाथर्डी, आष्टी तालुक्‍यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार उपजिविकेसाठी इतरत्र जातात. माणिकदौंडी भागातील लोकांकडे कोळसा कामगार म्हणून पाहिले जाते, तर इतर भागातील लोक शेतमजूर आहे.
जगाच्या नकाशावर या डोंगररांगेचे स्थान साधारणतः अक्षांश उत्तर 18 डिग्री 20 मिनिटे ते 19 डिग्री 59 मिनिट असे आहे, तर रेखांश पूर्व 73 डिग्री 40 मिनिट ते 75 डिग्री 43 मिनिटे या दरम्यान आहे. या पट्ट्यातील हवामान चांगले असते.
या भागात साधारणतः कमाल 42 अंश सेल्सिअस व किमान आठ अंश सेल्सिअस तापमान असते, तर आर्द्रता 34 ते 81 टक्के दिवसा आणि रात्री 17 ते 24 टक्के इतकी असते. त्यामुळे पिके, आरोग्य, वनस्पतींना हे वातावरण चांगले आहे. या निसर्गनिर्मित बाबींचा लाभ घेऊन या भागाचा विकास चांगला होऊ शकतो. या डोंगरात पडणारे पाणी अडवून ते जिरविल्यास किंवा त्याचा साठा मोठ्या प्रमाणात केल्यास त्या भागातील लोकांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. शिवाय पर्यटनासाठी ही डोंगररांग महाराष्ट्राला खुणावेल. पर्यटनवाढीमुळे ग्रामस्थांनाही उपजिविकेचे साधन वाढू शकेल.

जलसंधारण ः
डोंगरी भागात वन खाते, कृषी खाते, वॉटर, इंडो-जर्मन, नाबार्ड, तसेच इतर पाणलोट विकास संस्थांनी यापूर्वी विविध कामे केली असली, तरी ती तोडकी आहेत. प्रत्येक डोंगरावर चर खोदून पाणी अडविणे गरजेचे आहे. तसेच वृक्षारोपणाची व्यापक मोहीम घेणे गरजेचे आहे. डोंगरात असलेल्या मोठमोठ्या नाली सिमेंट बंधाऱ्याने अडविल्यास पठारावरील व डोंगरातील पाणी डोंगरातच जिरेल. त्याचा फायदा विहिरींना व वनस्पतींच्या वाढीसाठी होईल. डोंगरांच्या पायथ्याला असलेल्या भू-भागाचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे प्रत्येक ऐकरमध्ये किमान दोन गुंठे आकाराचे शेततळे झाल्यास पाणीसाठवण मोठे होऊ शकेल.
डोंगरावर पडलेले पाणी बंधारे, शेततळी आदींच्या माध्यमातून अडविले गेले पाहिजे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, भू-जलतज्ज्ञ प्रा.डॉ. बी. एन. शिंदे यांनीही या भागाच्या विकासाबाबत अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.
आयुर्वेद संशोधन ः
या डोंगरात असलेल्या विविध औषधी वनस्पतींचे संशोधन होऊन त्यांची चांगल्या प्रकारे ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संशोधन व्हावे. सरकारने हा डोंगर संरक्षित करून त्याचा विकास केला, तर हे शक्‍य आहे. आयुर्वेद वनस्पतींवर संशोधनासाठी शासनाने संशोधकांना मानधन देऊन या कार्याला चालना द्यावी, से झाल्यास या वनस्पती जागतिक बाजारपेठेतसुद्धा जाऊ शकतील. वनस्पतींचे व्यावसायिकीकरण झाल्यास करोडो रुपयांचे उत्पन्न हे डोंगर मिळवून देऊ शकतील.

पर्यटन विकास ः
या डोंगररांगेत विविध पर्यटनस्थळे आहेत; परंतु पर्यटकांना त्यांची विशेष माहिती नसल्याने ते दुर्लक्षित राहिल आहेत. त्यासाठी प्रत्येक पठारी भागातून आणि डोंगराच्या महत्त्वाच्या भागातून रस्ते होणे गरजेचे आहे. शहरातील अनेकांना आठवड्यातून एक दिवस तरी ग्रामीण भागात, शुद्ध हवेत, निसर्गाच्या सानिध्यात राहू इच्छिणाऱ्यांची सोय होऊ शकेल. त्यासाठी शासनानेच ठिकठिकाणी विश्रामगृहे तयार केल्यास कमी खर्चात हा आनंद मिळविता येईल. गिरिभ्रमण करणारे, औषधी वनस्पतींचा अभ्यास करणारे, तसेच पर्यटकांना या विश्रामगृहांचा फायदा होऊ शकेल. पर्यायाने हॉटेल व्यवसाय वाढीस लागून स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकेल.

दुग्धव्यवसायास चालना ः
डोंगरी पट्ट्यात चांगली जमीन योग्य हवामानामुळे दुग्धव्यवसाय चांगला चालू शकतो. या डोंगरातील पौष्टिक चाऱ्यामुळे "कमी चाऱ्यावर दूध' अशी उक्ती प्रचलित झाली आहे. शहराजवळील किंवा बागायती पट्ट्यातील जनावरांना मिळणारा चारा हा विविध रासायनिक खतांचा मारा करून तयार केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या दुधातही त्याचे अंश उतरू शकतात; परंतु डोंगरी गाई-म्हशींना मिळणारा चारा हा डोंगरातील गवत, कडबा, डोंगरातील विविध वनस्पती अशा स्वरुपात मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे येथील जनावरांपासून मिळणारे दूध अधिक चांगले समजले जाते. या व्यवसायास अनुकूल परिस्थितीमुळे शासनाने दुग्धव्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देऊन हा व्यवसाय वाढविता येऊ शकेल.

पवनऊर्जा ः
पवनऊर्जेसाठी लागणारे अनुकूल हवामान या डोंगरांवर आहे. त्यामुळे पवनऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. ते पर्यटनाच्या दृष्टीनेही उपयुक्त होत आहेत.

शैक्षणिक विकास ः
शिक्षण हा विकासाचा आत्मा असतो. त्यामुळे डोंगरपट्ट्यातील मुलांना चांगले शिक्षण दिले, तर ते या भागाचा विकास अधिक करू शकतील. आधुनिक पद्धतीने शेती होऊन त्यांच्या राहणीमानामध्ये त्या फायदा होऊ शकेल.
गर्भगिरीच्या विकासासाठी विविध संत-महात्मे, राजकारणी मंडळींच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. गर्भगिरीच्या डोंगरांत वनौषधींमुळे नाथ संप्रदाय स्थिरावला. आताही विविध साधूसंत आपल्या कर्तृत्वाने समाजप्रबोधन करीत आहेत. या भागाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. वृद्धेश्‍वर देवस्थान येथीलविजयनाथ बाबा आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. धार्मिक प्रबोधन त्यांच्यामुळे होते. शहा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शहापूरचे दत्त दिगंबर महाराज हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. परिसराच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन असते.
सातवड (ता. पाथर्डी) येथील ज्ञानानंद महाराजांनी त्या परिसरातील निसर्ग फुलविला आहे. ग्रामस्थांना धार्मिक बळ देऊन व्यसनमुक्तीचे महान कार्य करणारे ज्ञानेश्‍वर माऊली कराळे हे करंजीच्या घाटातील मठात असतात. राष्ट्रसंत (कै.) कुशाबा महाराज तनपुरे यांनी 1972 मधील दुष्काळात अन्नदानाच्या माध्यमातून गावे जगविली. गहिनीनाथ गडावरील (कै.) संत वामनभाऊ यांनी पशुहत्याबंदीसाठी मोलाची कामगिरी केली. भृंगऋषी दऱ्यातील शेंगदाणेबाबा, तसेच ज्ञानेश्‍वरी मुखोद्‌गत असलेले , वारकरी संप्रदायाला गती देणारे व ज्ञानेश्‍वरीचे तत्वज्ञान सांगणारे मुकुंदकाका जाटदेवळेकर, प्राचीन वारसा जपणारे व शिव उपासक नागनाथ देवस्थानजवळील गुरु विरुपाक्ष स्वामी महाराज आदींचे या डोंगररांगेसाठी महत्त्वाचे योगदान आहे. करंजी, मोहटा परिसर, पाटोदा तालुका, शिरुर कासार तालुक्‍यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विविध ठिकाणी हायस्कूल सुरू आहेत. त्यामुळे येथील मुलांना शिक्षण मिळत आहे. गर्भगिरी रांगेतील विविध पर्यटनस्थळांना "क' वर्ग दर्जा मिळू लागला आहे. अशाच प्रकारचा दर्जा गर्भगिरीतील इतर संस्थांना मिळणे गरजेचे आहे. या भागातील संपूर्ण रस्ते डांबरी होणे गरजेचे आहे, तसेच ग्रुप ग्रामपंचायतीऐवजी सर्व गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा. सध्या वाहतुकीची वर्दळ नसल्याने चांगले रस्ते नाहीत व रस्ते चांगले नसल्याने वाहतूक नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यासाठी रस्ते चांगले होणे आवश्‍यक आहे. विकास निधी वापरताना हा निधी इतरत्र न वळविता डोंगरी विकासासाठीच वापरला गेला पाहिजे.
हे काम झाले, तर खऱ्या अर्थाने गांधीजींचे "खेड्याकडे चला' हे स्वप्न साकार होऊ शकेल."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती' या ओवीनुसार वृक्ष हेच आपले पिढ्यान्‌ पिढ्यांसाठी सगे सोयरे आहेत. त्यांची जपवणूक केल्यास ते आपली जपवणूक करतील. या डोंगरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. ज्ञानोबा - तुकोबांचा वारसा सांगणाऱ्या उपासकांनी या ओवीचा अर्थ आचरणात आणण्याची खरी गरज आहे.

दुर्मिळ औषधींचे आगार

दुर्मिळ औषधींचे आगार

गर्भगिरी पर्वतरांग हे औषधी वनस्पतींचे माहेरघरच आहे. दुर्मिळ वनौषधींचे ते मोठे आगार आहे. वेगवेगळ्या वनस्पतींनी नटलेले हे डोंगर नगर व बीड जिल्ह्यांचे भूषण आहेत.
सर्व वनस्पतींचे ज्ञान नवनाथांना होते. त्याचा उपयोगही त्यांना माहिती होता. या डोंगररांगेत अशा बहुगुणी वनस्पती सापडल्यामुळे नवनाथांचे वास्तव्य या भागात दीर्घकाळ होते. विविध वन्य पशू-पक्ष्यांचाही यामुळेच या डोंगरात वावर असतो.
गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते येवलवाडी (ता. पाटोदा) दरम्यान या डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. अर्थात या खजिन्याची चावी जुन्या जाणकार व ठराविक व्यक्तींनाच सापडलेली असल्याने, विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधे देणारी अनेक मंडळी सापडतात. त्यांच्या औषधांनी आजारांवर गुणही येतो. साधी ठेच लागून जखम झाली, तर कोठेही सहज उपलब्ध होणारी "टनटनी' ही वनस्पती चोळून जखमेला "राम राम'ने ठोकणारी मंडळी कमी नाहीत, तर गजकर्ण किंवा इसबगोल यासारख्या जखमा हमखास बरे करणारी औषधी देणारी मंडळीही आहेत. बहुतेक ग्रामस्थ अनेक आजारांवर गावरान उपाय करून वेळ व पैसा वाचवितात. या डोंगरपट्ट्यातील शहा डोंगर, मांजरसुंभे, बिन्नी डोंगर, धुमाळ्या डोंगर, वाळूक टेंभा, खांडी, वाघजाई, देवदरा, पाची पोरांचे डोंगर, वृद्धेश्‍वर, बोकडदरा, सावरगाव डोंगर परिसर, पत्र्याचा तांडा (सावरगाव), आंबेवाडीचा डोंगर, येवलवाडी आदी डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. शिरुर कासार (जि. बीड) तालुक्‍यातील मानूरच्या नागनाथ देवस्थानजवळ, तर गोरख चिंचेचा विशाल वृक्ष आहे. ही चिंच अत्यंत दुर्मिळ व अनेक आजारांवर उपाय करणारी आहे. मुसळी, शतावरी, अश्‍वगंधा, सर्पगंधा, सोनतरवड, अर्जुनवेल, गुळवेल, अमृतवेल, बेल, भुईसल, चंदन, खैर, बाभूळ, अमोनी, निरधामना, हेकुळी, धावडा, वड, लिंब, घेटुळी, चिंच, सापकांदा, रानकांदा, चिबूकाटा, सराटा, रिंगणी, काटेरी रिंगणी, साबर, तरवड, रुई, तांदुळचा, धोत्रा, निंब, तुळस, रानतुळस, पानकनीस, आपाटा, एरंडी, तेलतुकडी, महादूत, निवडुंग, मेडसिंग, पाचुंदा, केकताड, दुधी, गुग्गुळ, निलगिरी, गुलमोहोर, घाणेरी, बांबू, रानमटकी, उंबर, बिबवा, महाडूक, सौंदड, अर्जुनसाल, उंबर, पिंपळ, सागर, पाथरी, पांगारा, सिंद, चिल्हर, सिसम, लोखंडी, पांढरी, रिठा, रामफळ, पळस, बहावा, निमोणी, हिवर, खिरणी, कोरफड, चिकणी, घायपती, साजरगोंडा, दवणा आदी औषधी वनस्पत
ी सर्रास आढळतात. डोंगरात चंदनाची झाडे सापडत असल्याने अनेक चंदनतस्करांची उपजीविका गर्भगिरीवर चालते. जांभूळ, आंबा, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पोपई, सीताफळ आदी फळांनी बागा बहरतात.
टेंभुर्णी, बोरे, खरमटे, कांगोण्या, जांभूळ, करवंद, निवडुंग, पिठावण्या, हामनं, खिरण्या, शेवंत्या, रानमटकी, धामण्या, तांबोरी आदी रानमेवा, तर येथील ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारा असतो. जाई-जुई, झेंडू, मोगरा जास्वंदी, शेवंती आदी सुगंधी फुलांनी डोंगर बहरतात. आनंददरी (बाळनाथ गड), वाघजाई हे डोंगर म्हणजे करवंदांची खाणच म्हणावी लागेल. शहा डोंगरावर खिरण्यांची अनेक झाडे आहेत.
गवताच्या विविधजाती येथे आहेत. त्यात कन्हेर, पवना, कुंदा, कुसळी, हरळ, शिपरुट, पाथरी, दुधावणी, कोंबडा, कुसमुड, तांदुळचा, कुंजीरचा, दिवाळी, लालडोंगा, मोळ, पानकनीस, राजहंस आदींचा समावेश आहे. प्रत्येक मोसमात या गर्भगिरीच्या झोळीत निसर्ग ही फळे - फुले भरभरून दान करतो. त्यामुळेच मधमाश्‍या, कीटक येथे मकरंद गोळा करण्यासाठी कायम घोंगावताना दिसतात. वांबोरी घाट, उदरमल घाट, पाची पोरांचे डोंगर, आनंद दरी, वाघदरी, आष्टी तालुक्‍यातील घाट, देऊळगावजवळील डोंगर, पाटोदा तालुक्‍यातील डोंगराचा भाग या भागात आगे, ब्राह्मणी, साधे मोहोळ मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळेच गोड मधाचे आगार म्हणून या गर्भगिरीकडे पाहिले जाते.
या भागात खरिपात बाजरी, वाटाणा, मूग, सूर्यफूल, तर रब्बीत ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. करडई, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणे आदींचे तेल पाडून शेतकरी घरगुती वापर करतात. पुणे येथील रसशाळेचे अभ्यासक या डोंगररांगेत विविध वनस्पतींचा अभ्यास करीत असतात.
उन्हाळी (विंचू उतरतो), पांढरी गुंज (अर्धशिशीला गुणकारी), काळे तीळ (मूळव्याधीसाठी उपयुक्त), कळलावी, धामसी, कडू दोडका, पडवळ, पादरवासी, निरगुडी, बहावा, मेडसिंग, सौंदड, वांज, करटुली, गुंज या वनस्पतींबरोबर बकान, पांढरी घोसळी, जायफळ, तांबडी जाई, टाखळ, पळस, हिरडा, मुळा, मूग मोरचूद, तोंडली, ब्रह्मदंडी, उटकटार, केवडा आदी वनस्पती त्या-त्या हंगामांमध्ये आढळतात.
उपयुक्त ठरणारी नाई ही दुर्मिळ वनस्पती या डोंगरात मोठ्या प्रमाणात सापडते. पांढरी अपमारी व नाई या दोन वनस्पतींपासून मधुमेहावर उपचार केले जातात, तसेच मधुनाशिनी ही वनस्पतीही मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरतात. नारळाची कवटी व टनटनी, तसेच इतर वनस्पतींपासून इसब या आजारावर औषध तयार होते.
चित्रक (मूळव्याध व इतर आजारांवर), धायटी, अडुळसा (कफ पातळ करण्यासाठी), बावच्याचे पीट (कोडासाठी उपयुक्त), रान भुईतरवड (पोटाच्या विकारांसाठी), सोनामुखी, हरणखुरी (उष्णतारोधक असते. हरणांच्या आवडीची वनस्पती), करटुली (फिट्‌ससाठी), पांढरी जादी (स्त्रीरोग), ज्येष्ठमध (मूळव्याधीसाठी), देवडांगरी (मोड मूळव्याधीसाठी), तालीम खाना (धातुपौष्टिक) आदी विविध आजारांवर उपचारांसाठी आवश्‍यक असणाऱ्या वनस्पती या डोंगरात आहेत. तोंड आल्यास जाईचा पाला चावला, तर ते गुणकारी ठरते. जाई ही वनस्पती जाईच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात आहे. अर्जुन सादाड या वनस्पतीची साल हाडाला लागलेल्या मार व शरिरावरील जखमांवर गुणकारी असते.
डोंगरातील या वनस्पतींचा उपयोग करून काही ठिकाणी उद्यान सुरू केले आहेत. प्रत्येक घराच्या आवारात किमान महत्त्वाच्या दहा वनस्पती असाव्यात, यामुळे किरकोळ आजारासाठी डॉक्‍टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
"बाई मी लाजाळू गं लाजाळू' या गाण्याच्या ओळी फक्त व्यक्तीपुरत्याच मर्यादित नाही, तर त्याला अपवाद आहे "वाघजाईचा डोंगर' नगर तालुक्‍यात असलेल्या या डोंगरात लाजाळूची असंख्य झाडे आहेत. त्याला हात लावला, की ही वनस्पती आपली पाने मिटवून घेते व लाजते.
आपण डोंगरातून फिरताना अनेक मौल्यवान वनस्पती पायाखाली तुडवून जातो, पण त्यांची ओळख झाल्यास त्याचे महत्त्व अधिक कळते. या गर्भगिरीत अशाच असंख्य वनस्पती जाणकारांना खुणावतात.
गोरक्षनाथांनी पूर्ण गर्भगिरी सोन्याचा केला, असा उल्लेख पोथी-पुराणांत आहे. सध्याही या औषधी वनस्पतींचा विचार केला, तर या डोंगराचे मोल सोन्यापेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल.